दादा जाधव यांच्यावर नवी जबाबदारी; संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी पक्षाचे नियोजन, सदस्य नोंदणी अभियानावर भर
स्थानिक पदाधिकारी निवडीत नवीन आणि जुने या मुद्दय़ावरून संघर्ष पेटला असताना या गदारोळात गुरुवारी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते दादा जाधव यांची नियुक्ती करत नव्याने आलेल्यांना प्रस्थापितांनी धक्का दिला. या पदासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे, अद्वय हिरे, केदा आहेर, मावळते जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांच्यासह आठ ते दहा जण इच्छुक होते. प्रत्येकाने आपली वर्णी लावण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली. परंतु, पक्षाने सर्वसमावेशक म्हणून जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत नव्याने आलेल्यांना प्रतीक्षा करण्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला आहे.
राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या जिल्हा व शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने भाजपमध्ये इतर पक्षांतून येणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले. याच दरम्यान सदस्यता नोंदणी अभियान सुरू असल्याने नव्याने आलेल्यांनी पुढील काळात त्याचे महत्त्व लक्षात घेऊन आधीच जय्यत तयारी करून ठेवली होती. त्याचा आविष्कार या निवडणूक प्रक्रियेत पाहावयास मिळत आहे. सिडको मंडल अध्यक्ष निवडणुकीत याच कारणावरून नवीन आणि जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले. शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्यावर शरसंधान साधण्यात आले. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, जिल्हाध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वाचे लक्ष होते. यासाठी सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे, केदा आहेर, शंकर वाघ, मावळते जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, विद्यार्थिदशेपासून भाजपचे काम करणारे देवळ्याचे दादाभाऊ जाधव यांचा इच्छुकांमध्ये समावेश होता. मतदान प्रक्रिया राबविल्यास पक्षांतर्गत मतभेद ठळकपणे समोर येण्याची शक्यता लक्षात घेऊन ज्येष्ठांनी इच्छुकांमधून सर्वसमावेशक नाव निश्चित करण्यास प्राधान्य दिले.
वसंत स्मृती या पक्ष कार्यालयात सकाळी इच्छुक समर्थकांसह हजर झाले. पक्ष निरीक्षक सुनील बढे यांनी मतदान प्रक्रिया न करता सर्वसमावेशक नाव निश्चित करण्याची जबाबदारी खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्यावर सोपविली. देवळ्याचे आ. डॉ. राहुल आहेर या वेळी उपस्थित होते. इच्छुक उमेदवार आणि नेते यांची बंद खोलीत चर्चा झाली. कोकाटे व हिरे यांनी आपले नाव आघाडीवर राहील यासाठी व्यूहरचना केली होती. परंतु काही महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्यांकडे ही जबाबदारी सोपविल्यास प्रदीर्घ काळापासून काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाण्याच्या शक्यतेकडे लक्ष वेधण्यात आले. विद्यार्थिदशेपासून पक्ष कार्यास वाहून घेणाऱ्या जाधव यांना हे पद देण्यावर एकमत घडविण्यात आले. नव्याने आलेल्या इच्छुकांची समजून काढण्यात आली. जिल्हाध्यक्षपदावर दादा जाधव यांची निवड झाल्याचे जाहीर झाल्यावर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

जलदगती तिकिटानंतर पदांसाठी हात आखडता
या निवडीच्या माध्यमातून भाजपने नव्याने आलेल्यांना सूचक संदेश दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी प्रवेश करून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यात काहींना पराभवाला तोंड द्यावे लागले. सद्य:स्थितीत पक्षाचे जिल्ह्य़ात चार आमदार आहेत. ही संख्या विस्तारण्यासाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी प्रभावीपणे करावी लागणार आहे. पक्षासाठी अनेक वर्षांपासून झटणारा पदाधिकारी ही जबाबदारी अधिक योग्य प्रकारे निभावू शकेल असा मतप्रवाह होता. नव्याने आलेल्यांना विधानसभा निवडणुकीची तिकिटे ज्या जलदगतीने दिली गेली, त्याच पद्धतीने संघटनात्मक पदे देण्यास भाजपने हात आखडता घेतल्याचे या निवडीने अधोरेखित केले.