प्रचारपत्रकात पत्ता नसल्याने कारवाई

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवार हेमलता पाटील यांच्या निवडणूक माहितिपत्रकावर प्रकाशकाचा पत्ता, मुद्रकाचे नांव आणि पत्ता नसल्याने काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादीचे रंजन ठाकरे यांच्यासह मुद्रकावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात आचारसंहिताभंगाचा दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सध्या सर्वच पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व मार्गाचा अवलंब केला जात आहे. काँग्रेस आघाडीच्या उमेदवार डॉ. पाटील यांच्या घरासमोर ही प्रचारपत्रके आढळून आली. या संदर्भात अरविंद भोर यांनी तक्रार दिली.  निवडणुकीच्या प्रचार, माहितिपत्रकावर उमेदवाराला प्रकाशक, मुद्रक यांचे नाव आणि त्यांचा पत्ता छापणे बंधनकारक आहे.

काँग्रेस उमेदवाराच्या माहितिपत्रकांचे प्रकाशन करताना ती दक्षता घेतली गेली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून या माहितिपत्रकाचे प्रकाशक काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आणि क्यूब इव्हेंट अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हर्टायजिंग या मुद्रक संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात काँग्रेस उमेदवार डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित माहितिपत्रकाचा तो कच्चा मसुदा होता, असे नमूद केले.

जिल्ह्य़ात १४ गुन्हे

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्य़ात आचारसंहिता भंग झाल्या प्रकरणी आतापर्यंत १४ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक सहा गुन्हे मालेगाव मध्य मतदारसंघात दाखल आहेत. निफाड आणि कळवणमध्ये प्रत्येकी तीन, बागलाण आणि इगतपुरीत प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. उर्वरित नांदगाव, मालेगाव बाह्य़, येवला, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, देवळाली या मतदारसंघात आचारसंहितेचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. शहरातील नाशिक मध्य मतदारसंघात पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.