जिल्ह्य़ात सर्वाधिक म्हणजे तब्बल ६० हजार ८१३च्या मताधिक्याने दिंडोरी मतदार संघात राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांनी विजय मिळवला, तर सर्वात कमी म्हणजे २०७८ मतांच्या फरकाने सिन्नरचे माणिक कोकाटे हे निवडून आले. सेना-भाजपच्या विजयी उमेदवारांच्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांनी लक्षणीय मताधिक्य मिळविले. त्यास अपवाद ठरले ते मालेगाव मध्यचे दादा भुसे. त्यांनी ४७ हजार ६८४ मतांच्या फरकाने विजय प्राप्त केला. निकालात वाढलेले आणि घटलेले मताधिक्य बरेच काही दर्शवीत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत मनसेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून भाजपने शहरातील तिन्ही मतदारसंघांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. या निवडणुकीत ते वर्चस्व कायम राहिले. परंतु, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्वमध्ये मताधिक्य कमी झाल्याचे दिसून येते. गेल्या नवेळी भाजपच्या तिन्ही उमेदवारांनी शहरात २५ ते ३० हजारांच्या फरकाने दणदणीत विजय संपादित केला होता. यंदा नाशिक मध्य वगळता इतर मतदारसंघांत तसे मताधिक्य मिळाले नाही.

नाशिक मध्यमध्ये भाजपच्या देवयानी फरादे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळविताना मताधिक्य कायम राखले. त्यांनी २८ हजार ३९८ मतांच्या फरकाने काँग्रेसच्या हेमलता पाटील यांना पराभूत केले. सेनेच्या बंडखोरीमुळे चर्चेत राहिलेली नाशिक पश्चिमची जागा भाजपने राखली. मात्र मताधिक्य कमालीचे घटले. भाजपच्या सीमा हिरेंनी राष्ट्रवादीच्या अपूर्व हिरेंचा नऊ हजार ७४६ मतांच्या फरकाने पराभव केला. तसेच चित्र नाशिक पूर्वमध्ये होते. दोन आयारामांमधील लढत भाजपने प्रतिष्ठेची केली होती. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या मतदारसंघाकडे लक्ष दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा मतदारसंघात झाली होती. पण, तिथेही भाजपचे मताधिक्य गेल्या वेळच्या तुलनेत बरेच कमी झाले.

भाजपच्या अ‍ॅड. राहुल ढिकलेंनी १२ हजार मतांच्या फरकाने राष्ट्रवादीच्या बाळासाहेब सानपांना पराभूत केले. ग्रामीण भागातील मतदारसंघात विजयी झालेल्या भाजप उमेदवारांनी तुलनेत चांगली कामगिरी केली. चांदवडमध्ये डॉ. राहुल आहेर यांनी २७ हजार ७४४ मताधिक्याने विजय मिळवत दुसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश केला. बागलाण मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे यांनी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार दीपिका चव्हाणांना ३३ हजार ६९४ मतांच्या फरकाने पराभूत केले. जिल्ह्य़ात शिवसेनेला केवळ दोन जागा मिळाल्या. यामध्ये राज्यमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव बाह्य़ मतदारसंघात ४७ हजार ६८४ मतांच्या फरकाने विजय मिळवला. तर नांदगाव मतदारसंघात सेनेचे सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळांचा १३ हजार ८८९ मतांनी पराभूत केले.

जिल्ह्य़ात सर्वाधिक मताधिक्य मिळविणारे उमेदवार ठरले ते दिंडोरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवाळ. त्यांनी ६० हजार ८१३ मतांच्या फरकाने सेनेच्या भास्कर गावितांना पराभवाची धूळ चारली. विजयाची हॅट्ट्रिक साधताना झिरवाळांनी मताधिक्य वाढविले. विविध कारणांमुळे गाजलेल्या येवला मतदारसंघात सलग चौथ्यांदा विजय मिळविताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मोठय़ा फरकाने सेनेच्या संभाजी पवारांना चीतपट केले. भुजबळांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत ५६ हजार ५२५ अधिक मते मिळवली. देवळालीत राष्ट्रवादीच्या सरोज अहिरेंनी योगेश घोलपांना ४१७०२ मतांनी पराभव करत सेनेच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावला. जिल्ह्य़ात निसटता विजय राष्ट्रवादीच्या माणिक कोकाटेंना मिळाला. त्यांनी सेनेचे आमदार राजाभाऊ वाजेंना अवघ्या २०७२ मतांनी पराभूत केले. कळवणमध्ये राष्ट्रवादीच्या नितीन पवार यांनी ६, ५९६ मतांनी माकपचे जीवा पांडु गावित यांचा पराभव केला. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्य़ात चंचूप्रवेश करणाऱ्या एमआयएमच्या मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी काँग्रेसच्या आसिफ शेख यांना ३८ हजार ५१९ मतांच्या फरकाने धूळ चारली. इगतपुरी मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे राखला. काँग्रेसचे हिरामण खोसकर यांनी शिवसेनेच्या निर्मला गावितांना ३१ हजार ५५५ फरकाने पराभूत केले.

राजकीय पक्षांच्या मताधिक्यात पडलेला फरक निवडून आलेल्या उमेदवारांना विचार करायला लावणारा आहे. काही जागांवर दणदणीत विजयाने सुखद धक्का बसला. मात्र घटलेल्या मताधिक्याने राजकीय पक्षांना भविष्यातील संकटाची जाणीव करून दिल्याचे दिसत आहे.