उमेदवारांचा आराम आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात १५ दिवस अक्षरश: झोकून देणाऱ्या उमेदवारांनी मतदानानंतरचा दिवस आराम करण्यात आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात, भेटीगाठी घेण्यात व्यतीत केला. निवडणूक प्रचार काळात दमछाक झाल्यामुळे सर्वानी मंगळवारी घरीच विश्रांती घेतली तर काहींनी उशिराने घराबाहेर पडत भेटीगाठी सुरू केल्या. मतदानाची अंतिम आकडेवारी हाती आल्यामुळे कुठे कमी, कुठे जास्त मते मिळणार, याचे अंदाज बांधत आता सर्वाचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

जिल्ह्य़ात १४८ उमेदवार असून त्यात ७२ अपक्षांचा समावेश आहे. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक १९, तर दिंडोरीत सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार आहेत. ऑक्टोबर हिट, पावसाची रिपरिप अशा वातावरणात जेमतेम १५ दिवसांचा अवधी प्रचाराला मिळाला. कमी वेळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना बरीच धावपळ करावी लागली. मतदानानंतर ही धावपळ संपुष्टात आल्यानंतर बहुतेकांचा जीव भांडय़ात पडला.  प्रचारात उमेदवारांना अनेकांचे सहकार्य मिळाले. त्यांचे आभार मानण्यास सर्वानी सुरुवात केली.

ग्रामीण भागातील मतदारसंघात मतदार विखुरलेले असतात. गावोगावच्या मतदारापर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक झाली. अल्प काळातील प्रचार करणे आव्हान होते. अधिकाधिक मतदारापर्यंत पोहचताना कोणी कसर सोडली नाही. नाशिक पश्चिममधील महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांची मंगळवारची सकाळ नेहमीप्रमाणे सहा वाजताच उजाडली. सकाळपासून कार्यकर्ते, हितचिंतकांची घरी रीघ लागली होती. कोणत्या केंद्रात किती मतदान झाले, कुठे कशी स्थिती होती, अशी माहिती संबंधितांकडून मिळाली. सलग १५ दिवसांहून अधिक काळ चाललेल्या प्रचाराने थकवा आल्याने संपूर्ण दिवस आराम करणार असल्याचे हिरे यांनी सांगितले. नाशिक मध्यच्या उमेदवार देवयानी फरांदे यांनी कार्यालयात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन दिवसभर विश्रांती करणार असल्याचे सांगितले.

देवळाली मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सरोज अहिरे यांच्या सकाळच्या सत्रात विशेष फरक पडला नाही. नेहमीप्रमाणे सहा वाजता उठल्यानंतर एका अंत्यविधीसाठी उपस्थित राहिल्या. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्याचे सत्र सुरू झाले. सायंकाळी कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे अहिरे यांनी सांगितले. मतदानानंतर छगन भुजबळ हे येवल्यात आणि पंकज भुजबळ नांदगाव मतदारसंघातच मुक्कामी होते. उभयतांनी सकाळपासून पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, चर्चा केली. दुपारी ते नाशिकला येतील, असे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

मालेगाव बाह्य़मधील महायुतीचे दादा भुसे यांच्या दिवसाची सुरुवात पदाधिकारी, शिवसैनिकांच्या गाठीभेटीने झाली. प्रचाराने थोडा थकवा आला. यामुळे नेहमीपेक्षा तासभर उशिरा उठलो. पण, आराम करून चालणार नाही. गावागावांमधील कार्यकर्ते कार्यालयात भेटीला आले. त्यांच्याशी चर्चा केली. मतदारसंघात काही दु:खद घटना घडल्या. प्रचारामुळे तिथे जाता आले नव्हते. अशा चार ते पाच ठिकाणी सांत्वनासाठी जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

चर्चाचे फड

सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचारात गुंतलेल्या अनेक उमेदवारांची मंगळवारची सकाळ उशिराच झाली. अनेकांनी भ्रमणध्वनीवर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष वा भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आभार मानण्यास प्राधान्य दिले. बहुतेकांनी भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत कुठून कसे मतदान झाले, हे जाणून घेतले. मतदान कसे झाले, त्याचा काय परिणाम होईल, यावर चर्चाचे फड रंगले.