पुनर्वसन वसाहतीत मूलभूत सुविधांची वानवा

इगतपुरी

तालुक्यातील काळुस्ते येथे बांधण्यात आलेल्या भाम धरणाचा वरील भराव कच्चा असल्याने खालील भागात धरणग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या गावांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करताना मूलभूत सुविधांची पूर्तता झालेली नाही. या स्थितीत जीव धोक्यात घालून राहण्याची वेळ धरणग्रस्तांवर आली आहे.

निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारा तालुका अशी इगतपुरीची ओळख आहे. या तालुक्यात जिथे शक्य आहे, तिथे शासनाने धरणांची उभारणी केली, परंतु धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष झाले. याआधीही वेगवेगळ्या धरणग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्या यादीत आता भाम धरणग्रस्तांचाही समावेश झाला आहे. काकुस्ते येथील भाम धरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. धरणग्रस्तांचे भरवज निरपण, सरुकतेवाडी, बोरवाडी येथे पुनर्वसन करण्यात आले. धरणाचा वरील भराव कच्चा असून त्यास भेगा पडण्यास सुरुवात झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करतात. भेगा पडल्या की वरचेवर माती टाकून बुजविल्या जातात. परिसरात सर्वत्र चिखल आहे.  पुनर्वसनासाठी केलेल्या रस्त्याची वेगळी स्थिती नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भेगा पडल्या आहेत. रस्त्यालगतचे वीज खांब कधी जमीनदोस्त होतील याची शाश्वती नाही. ज्या ठिकाणी पुनर्वसन  केले, तिथे येण्या-जाण्यासाठी रस्ता नाही. रस्ता चिखलमय आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही.

यंदापासून भाम धरणात ७० टक्के जलसाठा करण्यात येणार आहे. धरणग्रस्तांनी पुनर्वसनाच्या समस्या धरणावर कार्यरत अधिकाऱ्यांसमोर मांडण्याचा अनेकदा प्रयत्न केला, परंतु संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पुनर्वसन केलेल्या धरणग्रस्तांना धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी भरवज, निरपणचे सरपंच कृष्णा घारे, काळुस्ते येथील सरपंच रंजना घारे, सदस्य ज्ञानेश्वर घारे, देवराव फोडसे आदींनी केली आहे. राष्ट्रीय समता पक्षाचे अध्यक्ष एन. आर. साळवे यांनी धरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. धरणाचे काम चुकीचे झाले असून पुनर्वसनाचे काम धरणाच्या खालील भागात केले जात नाही. धरणात जलसाठा झाल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. याकडे शासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. या संदर्भात आपण जनहित याचिका दाखल केल्याचे साळवे यांनी म्हटले आहे.

पाणी, रस्ते, विजेचा प्रश्न

आमचे पुनर्वसन योग्य पद्धतीने केले गेले नाही. मूलभूत सुविधाही उपलब्ध केल्या गेल्या नाहीत. रस्ता तयार करण्यात आला नाही. आमच्या घरात पावसाचे पाणी साचते. सगळीकडे चिखल पसरला आहे. पिण्यासाठी पाणीपुरवठय़ाची व्यवस्था नाही. वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. घोटीपासून जी वीजवाहिनी आली आहे, ती जुनी असल्याने पहिल्याच पावसात तिने मान टाकली. कितीही नवीन खांब टाकले तरी मागचे खांब कुजलेले असल्याने कधी वीज तारा तुटतात, तर कधी खांब पडतात, अशी अवस्था असल्याचे ग्रामस्थ सांगतात. घोटी ते पुनर्वसन वसाहतीपर्यंत रस्त्याने नवीन वीज वाहिन्या टाकून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

भाम धरणात पहिल्यांदा जलसाठा केला जाणार आहे. जलसाठा करण्याची पहिलीच वेळ असल्याने काही अडचणी येणे स्वाभाविक आहे. पाणी झिरपणे किंवा अन्य कोणत्याही समस्यांचा अभ्यास करून नंतर दुरुस्तीचे काम करण्यात येईल.

– पाटबंधारे विभाग अधिकारी, भाम धरण