News Flash

..हे आधीच का झाले नाही

सणोत्सवाचा आनंद घेण्यात मग्न असणाऱ्या नागरिकांमध्ये या घटनांनी भीतीचे वातावरण पसरले.

नाशिकरोड भागात संचलन करताना पोलीस.

दसऱ्याच्या सणावर शहरातील काही भागात झालेली वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटनांमुळे विरजण पडले असताना या दिवशी दुचाकीवर घोषणाबाजी करणाऱ्यांना अटकाव करण्याऐवजी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्यावरून सर्वसामान्य वेठीस धरले गेल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या मुद्यावरून राजकीय नेत्यांनी पोलिसांना जबाबदार धरले. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मात्र पोलिसांनी योग्य पद्धतीने काम केल्याचे म्हटले आहे.

जनक्षोभामुळे होरपळणाऱ्या नाशिक जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदाकडे वाटचाल करत असताना मंगळवारी रात्री पुन्हा त्यास गालबोट लागले. दुचाकी वाहनांवर भ्रमंती करणाऱ्या जथ्यांनी ठिकठिकाणी दगडफेक करत वाहनांची जाळपोळ केली. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असेच प्रकार घडले. दोन गट समोरासमोर आल्याने धुमश्चक्री उडाल्याचे सांगितले जाते. त्यात चार ते पाच जण जखमी झाले. सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरील काही टोळक्यांनी ठिकठिकाणी धुडगूस घालत गोंधळ माजविला. सणोत्सवाचा आनंद घेण्यात मग्न असणाऱ्या नागरिकांमध्ये या घटनांनी भीतीचे वातावरण पसरले. शहरात दिवसभर दुचाकीवरून काही टोळकी घोषणा देत भ्रमंती करत असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. या टोळक्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सणोत्सवात असे गट भ्रमंती करणे हे नेहमीचे मानून त्याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. अखेरीस व्हायचे तेच झाले. सायंकाळनंतर उद्रेक होऊन शहरातील अनेक भाग दहशतीच्या सावटाखाली सापडले. पोलिसांनी आधीच खबरदारी घेतली असती तर हे प्रकार रोखणे शक्य होते, अशी भावना नागरिकांमधून उमटत आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर राजकीय पदाधिकाऱ्यांनी यंत्रणेवर टीकास्त्र सोडले आहे. स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी बुधवारी शहरातील विविध भागात संचलन करत यंत्रणेचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही कृती आदल्या दिवशी करणे गरजेचे होते, असेही अनेकांचे म्हणणे आहे.

पोलिसांनीच स्थिती नियंत्रणात आणली

मंगळवारी शहरात दोन ते तीन ठिकाणी गोंधळाचे प्रकार घडले. परंतु, पोलिसांनी तातडीने कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली. शांततेला बाधा पोहोचविणाऱ्या अनेकांना अटक करण्यात आली. पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करत आहे.

-आ. सीमा हिरे (भाजप)

 

पोलीस आयुक्तांना सूचना देऊ

दिवसाढवळ्या काही गट हातात काठय़ा घेऊन दुचाकीवरून फिरत असतील आणि पोलीस बघ्याची भूमिका घेत असतील तर ते योग्य नाही. कोणालाही असा गोंधळ घालण्याचा अधिकार नाही. या संदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करून अशा घटकांवर कारवाई करण्याची सूचना केली जाईल. -खा. संभाजीराजे भोसले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2016 2:00 am

Web Title: villagers burn vehicles in nashik after rape attempt of 5 yr old
Next Stories
1 ..तरीही स्वबळावर निवडणुका लढण्याचे काँग्रेसचे मनसुबे
2 संवेदनशील विषयात राजकारण -खा. संभाजी राजे
3 पीडितेच्या चौकशीसाठी नेत्यांची रीघ
Just Now!
X