जागतिक पातळीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची ओळख निर्माण व्हावी, यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील पध्दतीने शिक्षण देणाऱ्या १०० आंतरराष्ट्रीय शाळा सुरू केल्या जातील. त्यातील पहिली शाळा नंदुरबार येथे सुरू करण्यात येणार असल्याचे  शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. राज्यातील ज्या शैक्षणिक संस्थांच्या ५० हून अधिक शाळा आहेत, त्यांना स्वायत्तता देण्याचा शासनाचा विचार असल्याचे त्यांनी नमूद केले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित शतायुषी संस्था संवाद संमेलनाचे उद्घाटन शनिवारी तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, कार्याध्यक्ष महेश दाबक, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते. शिक्षण व्यवस्थेत बदल स्विकारण्याची तयारी सर्वानी ठेवण्याची गरज असल्याचे तावडे यांनी नमूद केले. शिक्षण क्षेत्रातील विकास, बदलांसाठी वेगळे मार्ग चोखाळणाऱ्या शिक्षण संस्थांच्या मागे शासन भक्कमपणे उभे राहील. तसेच शिक्षण संस्थांना स्वायत्तत्ता देण्याचा शासनाचा मानस असून ज्या शैक्षणिक संस्थांच्या ५०-१०० किंवा त्याहून अधिक शाळा आहेत, त्यांना स्वायत्तता देत स्वतंत्र मंडळ दिले जाईल. संस्थेला स्वायत्तता देऊनही शासकीय अनुदान कायम राखले जाईल. गेल्या काही दिवसांत शिक्षकांवर शाळाबाह्य़ कामांचा येणारा तणाव पाहता ही कामे कमी कशी करता येतील यासाठी मुख्यमंत्री निवडणूक आयुक्तांशी चर्चा करणार आहेत. शाळांमधील बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी विद्यार्थी संख्या हा निकष ठरविण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठी संस्थांना मर्यादित स्वरूपात अधिकार असतील असे त्यांनी सूचित केले. दरम्यान, सुमन करंदीकर यांनी बीजभाषणात १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी आपले १०० वर्षांचे संचित सांभाळावे, वसा तसाच जपावा असे आवाहन केले. डॉ. काकतकर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवत नव्या उपक्रमांची आखणी सुरू असल्याचे सांगितले. उद्घाटन सत्रानंतर संस्था जीवनातील स्थित्यंतरे, वाटचाल शिक्षणाची, संस्थांच्या दैनंदिन अडचणी या विषयांवर परिसंवाद पार पडले.