एसटीमधून मजुरांची वाहनव्यवस्था

नाशिक : कोणाला बिहार.. कोणाला उत्तर प्रदेश.. कोणाला आसाम.. भारताच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आपल्या गावी परतण्यासाठी मजुरांचे जथ्थे मोठय़ा प्रमाणावर मुंबईहुन दररोज निघत आहेत. राज्य परिवहनने मजुरांना महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत पोहचविण्यासाठी बससेवा सुरू ठेवली आहे. परंतु, बसमध्ये सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत आहे.

टाळेबंदीचा वाढता कालावधी आणि थांबलेले अर्थचक्र यामुळे अस्वस्थ झालेला मजूर, कामगार वर्ग पोटापाण्याचा प्रश्न गावी जावून तरी सुटतो का, हे पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरीत होत आहे. पायपीट करणाऱ्या या वर्गासाठी राज्य परिवहनने बस, रेल्वेकडून श्रमिक रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. या सेवेचा लाभ आतापर्यंत हजारोहून अधिक स्थलांतरीत नागरिकांनी घेतला आहे. याशिवाय कोणी सायकलनेही घर गाठण्याच्या प्रयत्नात आहेत.

मुंबईहून सायकलवर २९ जण निघाले. सायकल रस्त्यात नादुरूस्त झाली तर हवा भरण्याचा पंप, दुरूस्तीचे सामानही घेतले. सायकलने जाणारा हा जथ्था पंचवटीतील हॉटेल जत्रा येथे अडविण्यात आला. प्रशासनाकडून त्यांना बस सेवेची माहिती देण्यात आली. याविषयी तुलसी बोरा या स्थलांतरिताने आम्हांला आसाममधील गोहाटीला जायचे असल्याचे सांगितले. सरकार म्हणते आम्ही मदत करू, परंतु दोन महिने झाले हाताला काम नाही. काम बंद आहे. घरमालक घरभाडे मागत होता. पैसे नसल्यामुळे १५ मे रोजी घर सोडले. सायकलवरच आम्ही निघालो. घरच्यांशी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संपर्कात असून कुठेपर्यंत आलो आहोत, याची माहिती देतो. सायकलने प्रवासात वेगवेगळ्या अडचणी जाणवल्या. पण घरी पोहचु या आशेने हा प्रवास सुरू असल्याचे बोरा म्हणाले. बोरा यांच्यासह सहकाऱ्यांनी आणलेल्या सायकली या बसमध्ये ठेवण्यात आल्यावर बस मार्गस्थ झाली.

प्रवाशांच्या जीवितास धोका

नाशिक शहरात जत्रा हॉटेल येथे परिवहन विभागाचे पथक २४ तास कार्यरत आहे. मालवाहू गाडी प्रवासी वाहतूक करत आहे त्यांना परिवहन विभाग यांच्या पथकाकडून थांबवून घेतले जाते. अशा मालवाहतूक वाहनांना अडवून त्यातील प्रवासी उतरवून महामंडळाच्या बसमध्ये बसविले जातात. मालवाहतूक वाहन जमा करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. पण मालवाहु वाहनातील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. त्यांना जेवण पाण्याची काहीच व्यवस्था केली जात नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे शारीरिक अंतर हा नियम कोठेच सांभाळला जात नाही. बसमध्ये ५० ते ६० प्रवासी बसविले जात आहेत.

– सचिन जाधव

(अध्यक्ष, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नाशिक जिल्हा)