१५२ संशयितांचे घरातच विलगीकरण

नाशिक : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग विदेशात गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी गृहभेटी देत आहेत. आतापर्यंत जिल्ह्य़ात १५२ संशयितांना घरातच विलग (होम कोरंटाईन) करण्यात आले आहे. तर ३३ रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

शहर परिसरात करोनावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेकडून धार्मिक स्थळे, मैदाने, जॉगिंग ट्रॅक, मंगल कार्यालय, लॉन्स, पान टपऱ्या, शाळा, महाविद्यालय बंद करून गर्दीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकांकडूनही खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायझरच्या वापरासह अन्य सुरक्षा मार्गाचा अवलंब होत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत १५२ विदेशी नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. गुरूवारी सकाळी मूळ नाशिकचे परंतु, काही दिवसांपूर्वी मलेशिया येथे फिरण्यासाठी गेलेले वयोवृध्द दाम्पत्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांची तपासणी करण्यात येत आहे. करोनाविषयी लोकही आता जागरूक होऊ लागले आहेत. विवाह सोहळ्यांमधील अल्प उपस्थिती हे त्याचेच द्योतक असून कोणाला सदीर्, खोकला झाला तरी त्याला काळजी घेण्याच्या सुचना केल्या जात आहेत. मांसाहार केल्यामुळेच करोना झाल्याचा गैरसमज जिल्ह्य़ातील आदिवासी भागात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये करोना नियंत्रण कक्ष स्थापन करून आजारा विषयी माहिती दिली जात आहे. विदेशातून आलेले मूळ नाशिककर हे आपल्या गावी परतत असल्याने सध्या मालेगाव, चांदवड, दिंडोरी, नांदगाव यासह अन्य भागात आरोग्य पथकाकडून विदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत १५२ नागरिकांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्यावर घरातच विलग करून उपचार सुरू असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात सर्दी, खोकला रुग्णांची तपासणी सुरू असून त्यांच्यात काही लक्षणे आढळल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात येत आहे. तसेच विदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती आशा, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून संकलित करण्यात येत असल्याचे डॉ. पवार यांनी नमूद केले. आदिवासी भागातही याविषयी प्रबोधन सुरू असून माहिती पत्रकांच्या माध्यमातून त्यांना आजाराची माहिती दिली जात आहे.

राज्य परिवहनतर्फे बसमध्ये ‘सुरक्षित अंतर ठेवा’

राज्य परिवहनतर्फे करोनाला अटकाव करण्यासाठी बसमध्ये प्रवाश्यांच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सुरक्षित अंतर ठेवून प्रवाशांना प्रवास करण्याच्या दृष्टीने काही आसने बंद करण्यात आली आहेत. गर्दी टाळण्यासाठी बसमध्ये उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. संपूर्ण बसमध्ये आसन क्षमतेच्या केवळ ५० टक्के प्रवासी बसविण्यात येत आहेत. आवश्यकता वाटल्यास जादा बस सोडण्यात येत आहेत.  तसेच गर्दीचे बस स्थानक दिवसातून दोन ते तीन वेळा सॅनिटायझर वापरून स्वच्छ धुण्यात येत आहे. प्रत्येक बस औषधमिश्रीत पाण्याने दररोज धुवून काढण्यात येत आहे. स्वच्छतागृहातही हॅन्डवॉश ठेवण्यात आले आहेत.