पक्षापेक्षा उमेदवारांचे कर्तृत्व पाहून मतदारांचा कौल; युवकांना संधी
लोकशाही व्यवस्थेतील सर्वात महत्त्वपूर्ण पाया असणाऱ्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी राजकीय पक्षही धडपड करू लागले असताना चाणाक्ष ग्रामीण मतदारांनी मात्र पक्षापेक्षा उमेदवारांचे कर्तृत्व पाहत आपला कौल दिल्याचे जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्य़ातील २५२ पैकी ३२ ग्रामपंचायतींची निवडणूक याआधीच बिनविरोध झाली होती. उर्वरित ग्रामपंचायतींच्या निकालात प्रस्थापितांऐवजी युवकांना मतदारांनी संधी दिली आहे.
राजकीयदृष्टय़ा ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी पक्षांनीही आटापिटा केल्याचे प्रचारावेळी दिसून आले. त्यामुळे प्रचारात चांगलीच चुरस निर्माण झाली होती. रविवारी त्र्यंबकेश्वर, पेठ, देवळा, दिंडोरी, इगतपुरी यांसह इतर तालुक्यांतील ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. विधानसभा, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांना विविध प्रकारचे प्रलोभन दाखविण्याचे प्रकार घडले, परंतु ग्रामीण मतदारांनी मतपेटीद्वारे आपली हुशारी पुन्हा एकदा दाखविली. वर्षांनुवर्ष ग्रामपंचायतीवर कब्जा करूनही कोणत्याही प्रकारची कामे न करणाऱ्या प्रस्थापितांना मतदारांनी दूर सारल्याचे अनेक ग्रामपंचायतींच्या निकालावरून समोर आले. ज्येष्ठांपेक्षा युवावर्गावर मतदारांनी अधिक विश्वास दाखविल्याने विजयी उमेदवारांमध्ये युवावर्गाचे प्रमाण अधिक आहे. दिंडोरी तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अधिक चुरस पाहावयास मिळाली. आठ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने, तर तीन ठिकाणी शिवसेनेने यश मिळविल्याचा दावा केला आहे. वणी, वरखेडा, आंबेवणी, निगडोळ, खेडले, राजापूर, जानोरी या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून आले.
मोहाडी, तळेगाव, दिंडोरी येथे शिवसेनेला बऱ्यापैकी यश मिळाले. काही ठिकाणी मातब्बरांना निसटत्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले. ग्रामीण भागातील राजकारणाची हवा कोणत्या दिशेने जात आहे, त्याचे प्रतिबिंब या निकालातून उमटल्याचे मानले जात आहे.देवळा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर फेरबदल झाले. मतदारांनी मातब्बरांना चांगलाच झटका दिला. खुंटेवाडी ग्रामपंचायत हे त्याचे उदाहरण म्हणता येईल. येथे १५ वर्षांपासून ठाण मांडून असलेल्यांना मतदारांनी दूर लोटत भाऊसाहेब पगार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सर्व ठिकाणी निवडून दिले. बहुतेक ठिकाणी युवावर्गाने प्रथमच मुसंडी मारली. अनेक ठिकाणी परिवर्तन होत असताना पिंपळगाव वाखारी येथे देवळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ११ पैकी आठ जागा जिंकत वर्चस्व कायम राखले. गुंजाळनगर येथे सीमा भवर व दत्तात्रय भवर या दाम्पत्याने सहा जागांवर बिनविरोध निवडून येण्याची करामत केली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये कोणा एका पक्षाचे वर्चस्व दिसून आले नसले तरी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप यांनी आपल्या पक्षांना चांगले यश मिळाल्याचा दावा केला आहे. इगतपुरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांमध्ये संमिश्र चित्र दिसून आले. आवई दुमाला, भरवस-निरूपण, भावली, अडसरे, कोऱ्हाळे येथील निवडणुकांमध्ये प्रस्थापित आणि युवावर्ग दोघांना मतदारांनी समान स्थान दिले.