News Flash

मतदार नोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडून हमीपत्र

१ जुलै रोजी राज्य मतदार दिवस राज्यात प्रथमच साजरा केला जाणार आहे.

 

महाविद्यालयात अर्ज भरण्याची व्यवस्था

अकरावीसह इतरही प्रवेश प्रक्रियेला महाविद्यालयांमध्ये सुरुवात झाली आहे. हे औचित्य साधून प्रवेश घेण्यास आलेल्या विद्यार्थ्यांकडून ‘वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यावर मी मतदार नोंदणी करेल’ असे हमीपत्र भरून घेतले जाणार आहे. ज्यांनी वयाचा निकष पूर्ण केला आहे, त्यांचा अर्ज महाविद्यालयात भरून घेण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ आणि तहसीलदार गणेश राठोड यांनी दिली.

१ जुलै रोजी राज्य मतदार दिवस राज्यात प्रथमच साजरा केला जाणार आहे. त्या अंतर्गत तरुणाईवर लक्ष केंद्रीत करताना मतदार नोंदणी अभियानातून कोणताही घटक वगळला जाणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. तरुण व पात्र मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्यासाठी १ ते ३१ जुलै या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांची मदत घेण्यात येणार आहे.

विविध परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून सध्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यावेळी १६ ते १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेतले जातील, असे बढे-मिसाळ यांनी सांगितले. मतदार नोंदणीसाठी १८ वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे. हा निकष पूर्ण करण्याच्या मार्गावर असणाऱ्या तरुणाईला भविष्यात मतदार नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहीत करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. १८ वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी, महाविद्यालयांना आवश्यक ते अर्जही देण्यात येणार आहे. प्राचार्यानी नोंदणी करून दिलेले एकगठ्ठा अर्ज निवडणूक शाखा स्वीकारणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

या कार्यक्रमात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बढे-मिसाळ यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर १ जुलै रोजी राज्य मतदार दिवस साजरा करण्यात येणार असून त्या अंतर्गत राज्यस्तरावरील कार्यक्रम नाशिक येथे होणार आहे. त्या अंतर्गत विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येईल.

विविध उपक्रम

राज्य मतदार दिनी महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर युवक महोत्सवांचे आयोजन करण्यात येईल. इयत्ता नववी ते बारावीच्या भावी मतदारांना इव्हीएम यंत्राची कार्यपद्धती दृक्श्राव्य पद्धतीने सादर केली जाईल. ‘प्रत्येक मत मोजले जाते’ या संकल्पनेवर आधारित निबंध, वक्तृत्व, चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, टपाल, ऑनलाईन पद्धत, नागरी सेवा केंद्र व निवडणूक आयोगाच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे भरलेला अर्जही स्वीकारला जाईल. बीएलओच्या मदतीने स्थलांतरित, अपंग आदिवासी, बेघर, तृतीयपंथी यासारख्या प्रवर्गासाठी त्यांच्या रहिवासी ठिकाणी मतदार नोंदणीसाठी कार्यक्रम राबविला जाईल. सर्व वयोगटातील मतदारांना छायाचित्र ओळखपत्रांचे वितरण, मतदार यादीतील दुबार मतदारांची नावे कमी करणे, महिलांच्या मतदार नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न, विवाहित महिलांची पूर्वीची नोंदणी रद्द करून नवीन ठिकाणी नोंदणी व सैन्य दलातील मतदार नोंदणीसाठी कार्यक्रम असे उपक्रम होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2017 1:15 am

Web Title: voters registration student election
Next Stories
1 ५० टक्के लोकांमध्ये धोकादायक व्रण
2 भावली धरण पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार
3 ..तरच ‘शून्य वीज अपघात’
Just Now!
X