भ्रमणध्वनी रेंजअभावी ६९ केंद्रे वगळली

नाशिक : जिल्ह्य़ातील साधारणत: ४७० केंद्रांवरील मतदान प्रक्रिया ‘वेब कास्टिंग’द्वारे पाहता येणार आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील ६९ केंद्रांवर भ्रमणध्वनीची रेंज नसल्यामुळे तिथून ही व्यवस्था करता येणार नाही. जिल्ह्य़ात चार हजार ४४६ मतदान केंद्र असून मतदानाच्या तारखेपर्यंत त्यात वाढ होऊ शकते. एकूण केंद्रांच्या किमान १० टक्के केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे वेब कास्टिंग होणार आहे.

यंदाची लोकसभा निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यात आली आहे. प्रचारार्थ उमेदवारांना सहज परवानगी देण्यापासून ते मतदारांना आचारसंहिता भंगाची तक्रार नोंदविण्यापर्यंतच्या कामांकरिता सुविधा, सुगम, पीडब्लूडी, सीविजिल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावीपणे वापर होत आहे. मतदान प्रक्रियेचे वेब कास्टिंग हा त्याचाच एक भाग. एकूण केंद्रांपैकी किमान १० टक्के केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे वेब कास्टिंग करावे, अशी निवडणूक आयोगाची सूचना आहे. जिल्ह्य़ात एकूण चार हजार ४४६ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. मतदार नोंदणी अभियान सुरू असून मतदारांच्या संख्येत प्रत्यक्ष मतदार यादी अंतिम करेपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर १४०० पेक्षा कमी मतदार राहतील. यामुळे मतदान केंद्रांच्या संख्येत काहीअंशी वाढ होऊ शकते. जिल्ह्य़ातील ४७० मतदान केंद्रांवरील प्रक्रियेचे वेब कास्टिंग केले जाणार असल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले.

वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यासाठी भ्रमणध्वनी आणि उच्च क्षमतेच्या इंटरनेट सुविधेची आवश्यकता असते. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या आदिवासीबहुल भागासह सटाणा तालुक्यातील ६९ मतदान केंद्रांवर भ्रमणध्वनी रेंज नाही. तिथे इंटरनेटची सुविधा पुरविणे अवघड आहे. यामुळे वेब कास्टिंगच्या यादीतून उपरोक्त केंद्रांना वगळावे लागणार आहे. ज्या केंद्रांवरून वेब कास्टिंग करायचे आहे, तिथे प्रथम सुविधा निर्माण कराव्या लागतील. उच्च दर्जा, क्षमतेची इंटरनेट सुविधा उपलब्ध करावी लागेल. या अनुषंगाने निवडणूक शाखा आणि बीएसएनएलचे अधिकारी यांची मंगळवारी बैठक झाली. ४७० मतदान केंद्रांवर आवश्यक ती सुविधा उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाली.