21 April 2019

News Flash

मतदान प्रक्रियेसाठी नाशिकमध्ये ५४७९ व्हीव्हीपॅट यंत्र दाखल

लोकसभा निवडणूक पारदर्शकरीत्या पार पडण्यासाठी यंत्रणेची तयारी

लोकसभा निवडणूक पारदर्शकरीत्या पार पडण्यासाठी यंत्रणेची तयारी

आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येणाऱ्या मागणीनुसार व्हीव्ही पॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नाशिकमध्ये पाच हजार ४७९ यंत्र दाखल झाले आहेत. मतदाराने कोणत्या पक्षाला तसेच उमेदवाराला मत दिले आहे, हे त्यांना पावती स्वरूपात समजणार आहे.

मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक शाखेने तयारी सुरू केली आहे.

त्याअंतर्गत आधी बॅलेट युनिट मतपत्रिका आणि कंट्रोल युनिट आणले गेले होते. आता बंगळूरूहून सहा कंटनेरमधून व्हीव्ही पॅट यंत्र दाखल झाल्याचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रज्ञा बढे-मिसाळ यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील सर्व मतदान केंद्रांवर या यंत्राचा वापर होणार आहे.

दिवाळीनंतर व्हीव्ही पॅट यंत्र प्रत्येक मतदान यंत्राला जोडून त्याची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाचे नियोजन करण्यात येणार आहे. पुढील काळात व्हीव्ही पॅट यंत्राविषयी जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्याचे निवडणूक शाखेचे नियोजन आहे. या यंत्राची कार्यपध्दती न्यायीक, पोलीस यंत्रणा, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासमोर सादर केली जाईल. नंतर सार्वजनिक ठिकाणी व्हीव्ही पॅटविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

मतदार प्रक्रिया पारदर्शक होण्यास या यंत्राचा कसा उपयोग होईल हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख निश्चित नसली तरी प्रशासकीय पातळीवर तयारीला सुरुवात झाल्याचे अधोरेखित झाले आहे.

व्हीव्ही पॅट यंत्रणा

मतदान यंत्राला व्हीव्ही पॅट ही यंत्रणा जोडलेली असते. मतदाराने मतदान केल्यानंतर पावती स्वरूपात त्यातून चिठ्ठी बाहेर पडून बॉक्समध्ये समाविष्ट होते. ती मतदाराला पाहता येते. जेणेकरून त्याने केलेले मतदान बरोबर नोंदविले गेले की नाही हे त्यांना लक्षात येते. मतदान यंत्राबाबत साशंकता व्यक्त केली जात असल्याने व्हीव्ही पॅटद्वारे त्यावर निवडणूक आयोगाने तोडगा शोधला आहे.

First Published on November 7, 2018 12:58 am

Web Title: vvpat new voting machine in nashik