नाशिक :  पौष महिन्यातील षट्तिला एकादशीनिमित्त सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथांच्या यात्रोत्सवासाठी म्हणजेच उटीच्या वारीसाठी हजारो वारकऱ्यांची गर्दी जमली. त्र्यंबक नगरीत सर्वत्र ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’असा एकच गजर ऐकू येत होता. शिस्तीने रांगते माऊलीचा अखंड नामजप करत वारकऱ्यांनी संत निवृत्तीनाथ महाराज आणि त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.

वारकऱ्यांमध्ये ‘उटीची वारी’ ला विशेष महत्व आहे. त्र्यंबक येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून वारकऱ्यांची मांदियाळी दाखल झाली. यंदा पाऊसमान आणि थंडीमुळे गर्दी काही अंशी रोडावेल अशी शंका व्यक्त होत असतांना सोमवारी गर्दीने उच्चांक मोडला. रविवारपासून दाखल झालेल्या चार ते पाच लाख भाविकांनी निवृत्तीनाथांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर काहींनी मोकळी जागा पाहत आपली शिदोरी सोडली. तर काहींनी सामाजिक संस्था, देवस्थानच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला. यंदा पहाटे होणारी शासकीय महापूजा ही सकाळी नऊ वाजता पालकमंत्री छगन भुजबळ आणि नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगांवकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी वारकरी जोडप्यालाही पुजेचा मान देण्यात आला. वारकऱ्यांना वेळेत दर्शन घेत बाहेर पडता यावे यासाठी श्री निवृत्तीनाथ मंदिर देवस्थानच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. पोलिसांनी गर्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला. थंडीचा तडाखा पाहता सर्दी, खोकला, ताप यासह अन्य काही आजारांशी संबंधित रुग्णांची आरोग्य विभाागाकडून तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक औषधोपचार करण्यात आले. कुशावर्त परिसरात गर्दीमुळे काही अनुचित घटना घडल्यास वेळेवर मदतीसाठी १०८ ची रुग्णवाहिका उभी करण्यात आली होती. त्र्यंबक देवस्थानच्या वतीनेही गर्दीचा आवाका पाहता तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले. राज्य परिवहनकडून ३०० बसगाडय़ांचा ताफा नाशिक-त्र्यंबक-घोटी अशा फेऱ्या मारत असतांना नियोजित  स्थानकाव्यतिरिक्त वारकऱ्यांनी हात दाखवताच गाडी थांबवत त्यांना त्र्यंबकच्या दिशेने तसेच नाशिक बस स्थानकापर्यंत आणण्यात येत होते.

त्र्यंबक नगरपालिका प्रशासनाने यात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमिवर आधीच अतिक्रमण मोहीम राबवली होती. तरीही यात्रोत्सवात व्यावसायिकांनी आपली दुकाने थेट रस्त्यावर मांडल्याने पायी चालणेही मुश्किल झाले. वारकऱ्यांची गर्दी, व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे त्र्यंबक देवस्थानच्या वतीने निघणारी श्रींची पालखी आणि एकादशी निमित्त सायंकाळी निघणारी निवृत्तीनाथांची पालखी यांनाही अडचणीस तोंड द्यावे लागले. पालखी सोहळ्यातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनास प्रयत्न करावे लागले.

निर्मळवारीलाला प्रतिसाद, पण ‘सफेद ध्वज’ संकल्पनेकडे पाठ

सामाजिक संस्थांच्या वतीने तीन वर्षांपासून सुरू असलेली ‘निर्मळ वारी’ संकल्पना वारकऱ्यांमध्ये रुजल्याचे समोर आले. वारकऱ्यांनी स्वच्छतागृहाचा वापर करण्यास प्राधान्य दिल्याने परिसरात स्वच्छता होती. मात्र अन्नाची नासाडी, पत्रावळीचा पसारा ठिकठिकाणी होता. जिल्हा प्रशासनाने सुचविलेल्या ‘सफेद ध्वज’ संकल्पनेकडे  त्र्यंबक वासीयांनी सपशेल पाठ फिरवली. बोटावर मोजण्या इतक्या नागरिकांनी आपली स्वच्छतागृहे जी बाहेरच्या बाजूने आहेत ती वारकऱ्यांना वापरू दिली.