संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौषवारी यात्रोत्सवास गुरुवारी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा आणि पालखीच्या माध्यमातून सुरूवात झाली. पहाटे पाच वाजता नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक निवृत्तीनाथ समाधी मंदिरात महापूजा झाली. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थानच्या नवीन विश्वस्तांच्या संकल्पनेतून साकारलेल्या २०० किलो चांदीच्या रथाचे लोकार्पण महाजन यांच्या उपस्थितीत झाले. या चांदीच्या रथातून अभूतपूर्व उत्साहात पालखी निघाली. धार्मिक व पर्यटनस्थळांच्या नियोजनबध्द विकासासाठी स्वतंत्र पूर्णवेळ अधिकारी नेमण्याचा विचार शासन करत आहे. या अधिकाऱ्यामार्फत निधीची तरतूद करून घेणे, कामांचे नियोजन, कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी राहील. त्यामुळे पुढील वर्षी नवीन विकास कामांचे सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथाचा संजीवन समाधी सोहळा, आषाढी यात्रा पंढरपूरला पायी वारीत अहमदनगर येथे होत असतो. वारकऱ्यांना तेथून समाधी सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे येणे शक्य नसल्याने संत, वारकऱ्यांच्या सहकार्याने पौषवारी यात्रोत्सव केला जातो. याकरिता दोन ते तीन दिवसात राज्यातून दिंडय़ा, पताकासह पायी वारीत लाखो भाविक त्र्यंबक नगरीत दाखल झाले. हजारो वारकऱ्यांनी कुशावर्तात स्नानाचा योग साधला. पहाटे पाच वाजता महाजन पती-पत्नीच्या हस्ते समाधी मंदिरात महापूजा करण्यात आली. यावेळी आ. बाळासाहेब सानप, नगराध्यक्षा विजया लठ्ठा, संस्थानचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, विश्वस्त पुंडलीकराव थेटे आदी उपस्थित होते. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थानच्या नवीन रथातून दुपारी पालखीला सुरुवात झाली. टाळ मृदुंगाच्या गजरात भारूड, कीर्तन व भजनांनी अवघी नगरी दुमदुमून गेली. त्र्यंबक राजाचे दर्शन घेतल्यानंतर पालखी समाधी मंदिराकडे मार्गस्थ झाली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांसह स्थानिकांनी मोठी गर्दी केली. निवृत्तीनाथ समाधी मंदिर हे महाराष्ट्राला अध्यात्मिक प्रेरणा देणारे ज्ञानकेंद्र असून या क्षेत्राच्या विकासासाठी शासन सर्व सहकार्य करेल, असे महाजन यांनी नमूद केले.