जलदिनानिमित्त जलजागृती सप्ताहांतर्गत येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात २१ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा हास्ययोग समन्वय समिती, नाशिक वकील संघ व विभागीय माहिती कार्यालय यांच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या हस्ते होणार असून जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून माहिती उपसंचालक सतीश लळीत, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड्. नितीन ठाकरे उपस्थित राहणार आहेत. नाशिक जिल्हा हास्ययोग समन्वय समितीतर्फे डॉ. सुषमा दुगड, आदिती वाघमारे, अ‍ॅड. वसंतराव पेखळे यांची ‘हास्ययोगातून जलसंवर्धन’ या विषयावर व्याख्याने होणार आहेत. तसेच ‘पाण्याशी मैत्री, जीवनाची खात्री’ हे पथनाटय़ही सादर करण्यात येणार आहे. अपुऱ्या पावसामुळे नाशिक जिल्ह्य़ावर जलतुटवडय़ाचे संकट ओढवले आहे. प्रत्येकास आवश्यक पाणी कसे मिळेल, यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे; परंतु पाण्याची बचत करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. दैनंदिन जीवनात पाण्याची बचत कशी करावी, या विषयावर कार्यक्रमात प्रबोधन होणार आहे.