11 December 2017

News Flash

दुष्काळात पोलिसांचे असेही जलसंवर्धन

श्रमदानातून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवत सर्वासमोर आदर्श ठेवला आहे.

मनमाड | Updated: May 26, 2016 3:10 AM

दुष्काळाच्या चटक्यांमुळे पाण्याचे महत्त्व सर्वाच्या लक्षात आले आहे. शासनानेदेखील नागरिकांना या प्रश्नावर जागृत करण्यासाठी जल बचतीच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अंतर्गत मनमाड शहर पोलीस ठाण्याने स्वयंस्फूर्तीने स्वनिधी आणि श्रमदानातून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवत सर्वासमोर आदर्श ठेवला आहे.

मनमाडचे नवीन पोलीस निरीक्षक पी. टी. सपकाळे यांनी शहरात टंचाईमुळे झालेली स्थिती लक्षात घेऊन ही संकल्पना मांडली. त्यास पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या अनुषंगाने रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प साकारण्याचे निश्चित झाले आणि बघता बघता त्यास मूर्त स्वरूपही आले आहे. शहर पोलीस ठाण्याची इमारत जुनी आणि कौलारू आहे. छतावरून पडणारे पाणी सर्वत्र वाहून जाते. या प्रकल्पासाठी सपकाळे यांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन १२ जणांची समिती स्थापन केली. या कामाची विभागणी करून प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आली. पोलीस ठाण्याच्या आवारात दर्शनी व मागील भागात दोन ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पाच बाय पाच आकाराचे दोन खड्डे करण्यात आले. त्यात दगडी कोळसा, वाळू, विटांचे तुकडे, मुरूम आदी टाकून हे शोषखड्डे भरले जातील. पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या छतावर पडणारे पाणी या खड्डय़ात नेण्यात येईल.

या कामासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी वर्गणी संकलीत केली. अनेकांच्या मदतीने हे काम सुरू आहे. शहरातील अनेक नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत पोलीस प्रशासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. यंदा सर्वत्र दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे जलबचत करणे ही सर्वाचीच जबाबदारी आहे. पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात वाहून जाते. हे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या प्रकल्पातून जमिनीत जिरवल्यास कूपनलिका, विहिरी यांना पाणी उतरू शकते.

शहर पोलीस ठाण्यात दोन कुपनलिका आहेत. त्यातील एक जुनी कूपनलिका पाण्याअभावी बंद पडली तर नुकतीच एक कुपनलिका करण्यात आली. त्यालाही जेमतेम पाणी आहे. या प्रकल्पाने परिसरातील जलसंवर्धनास हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. मनमाड शहरात तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. संस्था, संघटनांच्या सहकार्याने शोष खड्डय़ासारखे उपक्रमही हाती घेतले आहे. या उपक्रमाद्वारे पाणी टंचाई दूर होण्यास काही प्रमाणात का होईना मदत होईल, हीच त्यामागील भावना असल्याचे सपकाळे यांनी सांगितले.

First Published on May 26, 2016 3:10 am

Web Title: water conservation by police