25 February 2021

News Flash

कळवण तालुक्यातील पाणी पळविण्याचा घाट

आपल्या तालुक्यातील हक्काचे पाणी दुसऱ्यांना देण्यास विरोध निर्माण होऊ लागला आहे.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांचा आरोप

तालुक्यातील चणकापूर, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प तसेच धनोली, भेगू यांसारख्या लघुपाटबंधारे प्रकल्पांतील पाण्यावर तालुक्यातील लाभक्षेत्रातील जनतेचा प्रथम अधिकार आहे. तालुक्यातील पाणी पळविण्याचा घाट रचला जात असून वेळोवेळी केलेल्या विरोधामुळे पाणी पळविण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले आहेत. तालुक्यातील पाण्यावर इतरांकडून हक्क सांगितला जात असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था स्थापन करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात पाण्याची समस्या आता तालुका-तालुक्यांमध्येही संघर्षांस कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिकचे पाणी मराठवाडय़ाला देण्यावरून वाद निर्माण झाला असताना आता जिल्ह्य़ातच प्रत्येक तालुका त्यांच्या अखत्यारीतील पाण्यावर हक्क सांगू लागला आहे. आपल्या तालुक्यातील हक्काचे पाणी दुसऱ्यांना देण्यास विरोध निर्माण होऊ लागला आहे. पावसाळा वेळेवर सुरू न झाल्यास ही परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कनाशी गटातील तताणी, शृंगारवाडी, भाकुर्डे, कोसुर्डे, करंभेळ (क ), सरलेदिगर, खडकवण, आमदर, मोहपाडा, पळसदर, तिर्हपळ, चणकापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयांचे उदघाटन, पाणीपुरवठा योजना, रस्ते, अंगणवाडी केंद्र इमारत, सभामंडपाचे उद्घाटन जयश्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या विकास कामांचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी जयश्री पवार यांनी हक्काच्या पाण्याविषयी जनतेला सावध केले. अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून पुढील गावांसाठी पाणी सोडल्याने प्रकल्प कोरडापडल्याचा दावा करून भविष्यात तालुक्यात टंचाई निर्माण झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

दरम्यान, पर्यावरणातील असमतोलामुळे नियमित येणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी तालुक्यातील कनाशी जिल्हा परिषद गटात ३० सिमेंट बंधारे बांधण्यात आले असून त्यामुळे १०१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी दिली. कनाशी गटात गावागावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांच्यासमोर विविध अडचणी मांडल्या. मागण्या व समस्यांचे निवेदनही देण्यात आले. रस्ते, शिक्षण, आरोग्य व पाणी या मूलभूत सुविधांसह ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी, सभामंडप, पाणीपुरवठा योजना, अंगणवाडी इमारत यामुळे गावांचे रूप बदलले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ग्रामीण विकासाला प्राधान्य दिल्याने कोटय़वधी रुपयांची कामे मार्गी लागली. भविष्यातही विकास कामे सुरूच राहतील, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी दिला.

कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव, कळवण बाजार समितीचे उपसभापती रमेश पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 2:57 am

Web Title: water crisis in nashik kalwan district
Next Stories
1 खेडय़ांच्या विकासावर उद्या अनुभव समाज मेळावा
2 एकनाथ खडसेंविषयी स्थानिक लोकप्रतिनिधींची सावध भूमिका
3 नांदुरशिंगोटे येथे अपघातात तीन ठार
Just Now!
X