गंगापूर धरण समुहात समाधानकारक जलसाठा झाला नसल्याच्या पाश्र्वभूमीवर, गुरूवारपासून नाशिक शहरात एकवेळ पाणी पुरवठा केला जाणार आहे. बुधवारी दुरुस्तीच्या कारणास्तव सायंकाळी पाणी पुरवठा झाला नसल्याने नागरिकांना पहिल्याच दिवशी दुहेरी संकट झेलावे लागणार आहे. या माध्यमातून पुढील पावसाळ्यापर्यंत ३० टक्क्यांपर्यंत कपात केली जाणार आहे.
यंदाच्या हंगामात पावसाने सुरूवातीपासून वक्रदृष्टी फिरविली. अधुनमधून हजेरी लावणारा पाऊस बहुतांश काळ गायब राहिला. या एकंदर स्थितीमुळे ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागातील शेकडो गाव व पाडय़ांना टँकरने पाणी पुरवठा करणे क्रमप्राप्त ठरले. सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, शहरात लाखो साधू-महंत आणि भाविक दाखल झाले होते. या काळात पाणी कपात करणे अवघड होते. यामुळे अखेरची शाही पर्वणी होईपर्यंत या मुद्यावर फारशी चर्चाही केली गेली नाही. शहराला मुख्यत्वे पाणी पुरवठा गंगापूर धरण समुहाद्वारे केला जातो. त्यातील गंगापूर, काश्यपी व गौतमी-गोदावरी धरणात सद्यस्थितीत केवळ ५८८५ दशलक्ष घनफूट (६२ टक्के) जलसाठा आहे. महापालिकेला वार्षिक आरक्षित करण्याचा इतका हा जलसाठा नाही. यामुळे आतापासून बचत केल्यास पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी पुरवठा करणे शक्य होईल. ही बाब लक्षात घेऊन संपूर्ण शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. नवीन नाशिक (सिडको), सातपूरचा काही भाग व अन्य काही भागात दररोज एक वेळ पाणी पुरवठा केला जातो. त्या ठिकाणी कमी प्रमाणात कपात करण्यात येईल. उर्वरीत भागात दररोज दोनवेळा पाणी पुरवठा केला जातो, त्या परिसरात एक वेळ पाणी पुरवठा करून २० टक्क्यांपासून ३० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचे नियोजन आहे. पाण्याचा पुरेसा दाब निर्माण करण्यासाठीच्या नियोजनात काही भागात सकाळी व काही भागात सायंकाळी पाणी पुरवठा करण्यात येईल.
वॉटर पार्क, वाहने धुण्याची केंद्र यांचा पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे तर जलतरण तलाव, उद्यानांचा पाणी पुरवठा कमी करून नंतर बंद करण्याचे नियोजन आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.