एक वेळ पाणी पुरवठय़ाविषयी सर्वसाधारण सभेत आज निर्णय शक्य

नाशिक :  जिल्ह्य़ातील काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी शहर आसपासच्या भागात अद्यापही तो हुलकावणी देत आहे. सोमवारी जिल्ह्य़ात असेच चित्र होते. पावसाने पाठ फिरविल्याने वर्षभरात काटकसरीचे धोरण न अवलंबिणाऱ्या महापालिका प्रशासनास आता कपातीचा विचार करावा लागत आहे. त्याच अनुषंगाने मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ज्या भागात दोन वेळा पाणी पुरवठा होतो, तिथे एकदाच तर ज्या भागात एकवेळ पाणी पुरवठा होतो, तेथील पाणी पुरवठय़ात काहीअंशी कपात करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. पुढील काही दिवसांत पाऊस न पडल्यास आठवडय़ातील एकदा कोरडा दिवस अर्थात पाणी पुरवठा बंद ठेवण्याचाही प्रशासनाचा विचार आहे.

जून महिन्यातील प्रारंभीचे चार आठवडे पावसाच्या प्रतिक्षेत गेले. सोमवारी काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र, तो रिमझिम स्वरुपात होता. सध्या गंगापूर धरणात महापालिकेचे ४८५, दारणामध्ये १४८, मुकणे १९७ असे एकूण ८३१ दशलक्ष घनफूट आरक्षित पाणी शिल्लक आहे. गंगापूरमधून मुख्यत्वे शहराला पाणी पुरवठा होतो. पावसाने दडी मारल्याने हे धरण तळ गाठण्याच्या मार्गावर आहे. निम्नतम पातळीवरील पाणी उचलण्याची व्यवस्था नसल्याने शहराची पाणी पुरवठा व्यवस्था ठप्प होऊ शकते असा इशारा आधीच महापालिकेने दिला आहे. दुष्काळी स्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभागाने अनेकदा बजावले होते. परंतु, आरक्षित जलसाठा मुबलक असल्याने पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. आजवर पाणी कपातीचा विचार न करणाऱ्या पालिका प्रशासनाला जूनच्या अखेरीस तसा प्रस्ताव सादर करण्याची वेळ आली आहे.

महापौर रंजना भानसी आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणास भेट देऊन पाहणी केली होती. गंगापूरमधील विहिरीपर्यंत चर खोदण्याचे काम युध्दपातळीवर करण्याची तयारी करण्यात आली. चर खोदण्याच्या कामाची गती आणि पावसाचा अंदाज घेऊन प्रशासनाने अहवाल सादर करावा, असे महापौरांनी म्हटले होते. हा अहवाल प्रशासनाने सादर केला असून या संदर्भात मंगळवारी सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. प्रशासनाने सद्यस्थितीत जिथे दोन वेळा पाणी पुरवठा होतो तिथे एक वेळ पाणी पुरवठा करण्यास सुचविले आहे. तसेच ज्या भागात एक वेळ पाणी पुरवठा होतो, तिथेही काही अंशी कपात केली जाईल. पुढील १० ते १५ दिवसात पाऊस न झाल्यास आठवडय़ातील एक दिवस संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेऊन कोरडा दिवस पाळण्याचे सुचविण्यात आले आहे. यावर सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाईल. दरम्यान, पाणी कपातीला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध दर्शविला आहे.