दुष्काळामुळे ग्रामीण भागासह बहुतांश शहरे टंचाईला तोंड देत असताना या काळातही पाण्याचा मनसोक्त वापर करणाऱ्या नाशिक शहरात आता पाणीकपात लागू केली जाण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणीसाठय़ाचे येत्या ३१ जुलैपर्यंत नियोजन करण्यात येणार आहे. अर्थात जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्याशी चर्चा करून आणि नागरिकांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेणार आहे.

सद्यस्थितीत महापालिका धरणांतून प्रतिदिन १६ दशलक्ष घनफूट पाणी उचलते. हा वापर कमी केल्यास ते पाणी नियोजनास उपयुक्त होईल, असे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी म्हटले आहे. शुक्रवारी दुष्काळी आढावा बैठकीत पाण्याच्या काटकसरीने वापराच्या विषयावर चर्चा झाली. त्यावेळी कुंटे यांनी वरील संकेत दिले.

महापालिका गंगापूर धरणातून प्रतिदिन १५ ते १६ दशलक्ष घनफूट पाणी वापर करत असून महापालिकेने काटकसरीने वापर केल्यास पावसाळा उशिरा सुरू झाला तरी जुलैपर्यंत टंचाई भासणार नाही. मुकणे धरणातून महापालिकेने दोन दशलक्ष घनफूट पाणी घेणे सुरू केले आहे. महापालिकेने काटकसरीने वापर केल्यास पुढील नियोजनासाठी ते उपयुक्त ठरेल, याकडे कुंटे यांनी लक्ष वेधले. पाणीकपातीचा निर्णय घेताना प्रशासकीय यंत्रणांनी लोकप्रतिनिधी, गटनेते, नागरिकांनाही विश्वासात घ्यावे. सर्वाच्या सहकार्याने अंमलबजावणी झाल्यास फारशा अडचणी उद्भवत नसल्याचा अनुभवही कुंटे यांनी कथन केला.

लहान-मोठी २४ धरणे सामावणाऱ्या नाशिकमध्ये शेकडो गावे आणि वाडय़ांना टँकरने पाणी द्यावे लागत असून मनमाड, येवला, सिन्नरसह अनेक निमशहरांमध्ये सात ते २५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.  टंचाईची झळ आजवर नाशिक शहराला बसली नाही. याचे कारण म्हणजे नाशिक महापालिकेसाठीचे पाणी आरक्षण.

गंगापूर धरणातून ४२००, दारणामधून ४०० आणि मुकणे धरणातून ३०० असे एकूण ४९०० दशलक्ष घनफूट आरक्षित झालेले आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणात पुरेसा साठा असल्याने आजवर महापालिकेने पाणीकपातीचा विचार केलेला नाही.

..अन्यथा पाणी उचलण्यास अडचणी

नाशिक शहरासाठी सर्वाधिक ९० टक्के पाणी हे एकटय़ा गंगापूर धरणातून घेतले जाते. या धरणातील पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमधून खोदलेला चर हा वरच्या पातळीत असल्याने शेवटच्या दिवसांमध्ये जॅकवेलमध्ये पाणीपुरवठा होत नाही.

पर्यायाने जलाशयात वेगळे पंप लावून पाणी घ्यावे लागते. अथवा जादा पाणी धरणात ठेवावे लागते. या वर्षी दुष्काळ असल्याने गंगापूरमध्ये आरक्षण इतकेच पाणी शिल्लक आहे. यामुळे जुलै महिन्यात जॅकवेलमध्ये पाणीपुरवठा होण्यास अडचण येऊ शकते. २०१३ आणि २०१६ या वर्षांत पाणी उचलण्यास अडचणी आल्या होत्या. २०१५-१६ मध्ये महापालिकेसाठी गंगापूर धरणातून ३१०० आणि दारणा धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. तेव्हाच्या आणि सध्याच्या दुष्काळाची स्थिती सारखीच असून महापालिकेने २०१५-१६ च्या तुलनेत यंदा जादा पाणी वापर केलेला आहे. या पाश्र्वभूमीवर, महापालिकेला जलसाठय़ाचा काटकसरीने वापर करण्याची सूचना पालक सचिवांनी दिली आहे.