महापालिकेत आज बैठक

जूनच्या अखेपर्यंत धरण क्षेत्रात दमदार पाऊस नसल्याने पालिका प्रशासनाने शहरात पाणी कपात लागू करण्याच्या सुचविलेल्या प्रस्तावावर शुक्रवारी महापौर, गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. वर्षभरात काटकसरीचे धोरण अवलंबिले गेले नव्हते. जून महिना संपत आला तरी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे.

या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने ज्या भागात दोन वेळा पाणीपुरवठा होतो, तिथे एकदाच तर ज्या भागात एकवेळ पाणीपुरवठा होतो, तेथील पाणीपुरवठय़ात काहीअंशी कपात सुचविली आहे. तसेच पुढील आठवडय़ापासून आठवडय़ातून एकदा कोरडा दिवस अर्थात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचाही विचार आहे.

पाणी कपातीबाबत महापौर रंजना भानसी, गटनेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालिका आयुक्तांच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. यावेळी प्रशासनाकडून अहवाल सादर होऊन कपातीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. वास्तविक, प्रशासनाने जलसाठय़ाच्या सद्य:स्थितीबाबत तयार केलेला अहवाल सर्वसाधारण सभेत माहितीस्तव ठेवला जाणार होता. तथापि, मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपच्या काही सदस्यांनी वेगवेगळ्या मुद्दय़ांवरून सभागृहात गोंधळ घातला. काही विषयांवर तब्बल सात ते आठ तास चर्चा झाली, परंतु शहरवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाण्याच्या विषयावर कोणतीही चर्चा झाली नव्हती. त्यावर शुक्रवारच्या बैठकीत विचारविनिमय होणार आहे.

जून महिन्यातील प्रारंभीचे चार आठवडे पावसाच्या प्रतीक्षेत गेले. धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालेला नाही. शहरास गंगापूरमधून मुख्यत्वे पाणीपुरवठा होतो. पावसाने दडी मारल्याने हे धरण तळ गाठण्याच्या मार्गावर आहे. निम्नतम पातळीवरील पाणी उचलण्याची व्यवस्था नसल्याने शहराची पाणीपुरवठा व्यवस्था ठप्प होऊ शकते, असा इशारा आधीच पालिका प्रशासनाने दिला आहे. दुष्काळी स्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभागाने अनेकदा बजावले होते. परंतु पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. आजवर पाणी कपातीचा विचार न करणाऱ्या पालिका प्रशासनाला जूनच्या अखेरीस तसा प्रस्ताव सादर करण्याची वेळ आली.

मागील आठवडय़ात महापौर रंजना भानसी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणास भेट दिली होती. धरणातील विहिरीपर्यंत चर खोदण्याचे काम युद्धपातळीवर करण्याची तयारी करण्यात आली. चर खोदण्याच्या कामाची गती आणि पावसाचा अंदाज घेऊन महापौरांच्या सूचनेनुसार प्रशासनाने अहवाल तयार केला आहे. पाणी कपात कशी करायची हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. पाणी कपातीला भाजपच्या आमदारांनी आधीच विरोध दर्शविला आहे. तथापि, पावसाअभावी स्थिती गंभीर बनली आहे. कपातीबाबत सत्ताधारी भाजप सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने सुचविलेली कपात

*    सद्य:स्थितीत जिथे दोन वेळा पाणीपुरवठा होतो तिथे एक वेळ पाणीपुरवठा

*    ज्या भागात एक वेळ पाणीपुरवठा होतो, तिथेही काहीअंशी कपात

*    आठवडय़ातून एकदा कोरडा दिवस