गंगापूर धरणातून विसर्ग

नाशिक : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा ८० टक्क्यावर पोहचल्याने धरणाचे दरवाजे यंदा प्रथमच उघडण्यात आले. टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवून गुरुवारी सायंकाळी तो तीन हजार क्युसेकपर्यंत गेला. गोदावरी खळाळून वाहू लागली. धरणात समाधानकारक जलसाठा झाल्यामुळे पुढील आठवडय़ापासून शहरातील पाणी कपात रद्द होण्याची चिन्हे आहेत.

सुमारे दीड महिना पावसाने जिल्ह्य़ातील काही तालुक्यांचा अपवाद वगळता बहुतांश भागाकडे पाठ फिरवली होती. धरणांची पातळी कमी झाल्याने महापालिकेला ऐन पावसाळ्यात कपातीचा निर्णय घेण्याची वेळ आली होती. त्यानुसार दोन आठवडय़ापासून साप्ताहिक कपात केली जात आहे. त्र्यंबकेश्वरसह धरण परिसरात झालेल्या पावसाने शहराची कपातीतून सुटका झाली आहे. धरणांच्या जलसाठय़ाच्या वेळापत्रकानुसार ऑगस्टच्या मध्यापर्यंत धरणात ८० ते ८५ टक्के जलसाठा केला जातो. गुरूवारी जलसाठा ८० टक्क्यांवर पोहचल्यानंतर पाटबंधारे विभागाला विसर्ग करणे क्रमप्राप्त ठरले. सकाळी एक हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिल्याने सायंकाळपर्यंत तीन हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. पावसाळ्यात जवळपास दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गोदावरी दुथडी भरून वाहू लागली. होळकर पुलाखाली दुपारी चार वाजता १६३० क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह वाहत होता. गौतमी गोदावरीत (५२ टक्के), कश्यपी (४५) आणि आळंदी (६६ टक्के) जलसाठा झाला आहे. म्हणजे गंगापूर धरण समुहातील इतर धरणांच्या जलसाठय़ात वाढ होत आहे.

भावली, वालदेवी ही धरणे आधीच तुडूंब भरून वाहत आहे. मुकणे धरणात (४८), दारणा (७९), वाकी (४०), भाम (६३), कडवा (५३), पालखेड (५४), करंजवण (२०), वाघाड (४४), पुणेगाव (सात), हरणबारी (७२), केळझर (३८) असा जलसाठा झाला आहे. गंगापूरसोबत दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग करण्यात आला आहे. पावसाअभावी गंगापूरमधील जलसाठय़ाची स्थिती लक्षात घेऊन आठवडय़ातून एक दिवस संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. सलग दोन आठवडे या पध्दतीने कपात करण्यात आली. आता गंगापूर धरणासह समुहातील धरणांची पातळी उंचावल्याने कपातीची टांगती तलवार दूर झाली आहे. महापालिकेने कपात मागे घेण्याबाबत विचार सुरू केला आहे. सोमवारी पाणी पुरवठय़ाचा आढावा घेऊन कपात रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

पुढील बुधवारी पाणी कपात ठेवण्याची गरज भासणार नसल्याचे पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सूचित के ले आहे.