• स्लॅब कोसळून तीन जण जखमी, २० हून अधिक झाडे कोसळली
  • गटारी तुंबल्याने सांडपाणी गोदा पात्रात

वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या वळवाच्या पावसाने महापालिकेची  कामे आणि महावितरण कंपनीच्या तयारीचे पितळ उघड पाडले. पंचवटीतील तेलंगवाडी येथे स्लॅब कोसळून तीन जण जखमी झाले, तर अनेक भागांत २० हून अधिक झाडे आणि फांद्या कोसळल्या. भुयारी गटारी तुंबल्याने त्यातील पाणी थेट गोदापात्रात मिसळले. अनेक भागांत रात्रभर वीजपुरवठा खंडित राहिल्याने उकाडय़ाने नागरिक हैराण झाले. मखमलाबाद नाक्यावरील नवनिर्माण चौकात वीजतारांमुळे शॉर्टसर्किट होऊन झाडाला आग लागण्याची घटना घडली.

उंबरठय़ापाशी आलेल्या पावसाचे महाराष्ट्रात कधी आगमन होणार याची सर्वाना प्रतीक्षा असताना बुधवारी रात्री वळवाच्या पावसाने नाशिकला चांगलेच धुऊन काढले. गोव्यात पोहोचलेला पाऊस पुढील २४ तासांत राज्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. मागील पाच ते सहा दिवसांत उन्हाची तीव्रता कमी झाली, परंतु उकाडा वाढला. बुधवारी रात्री सव्वा ते दीडच्या सुमारास वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अर्धा ते पाऊण तास मुसळधार कोसळला. अनेक भागांत फांद्या तुटल्या, झाडे उन्मळली. वीजतारा तुटल्याने जवळपास संपूर्ण शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. पाऊस थांबल्यावर काही भागांत तासाभराने वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी काही भागांत रात्र अंधारात काढावी लागल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी गुरुवारी सकाळी वीजपुरवठा सुरळीत झाला.

वादळी पावसात पंचवटीतील तेलंगवाडी येथे स्लॅब कोसळून सुरेश जाधव, सोमनाथ भवर आणि श्याम हे तीन जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पंचवटी केंद्रातील पथकाने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. तिघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. श्याम यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मखमलाबाद रस्त्यावरील नवनिर्माण चौकात वीजतारांमुळे शॉर्टसर्किट होऊन एका झाडाला लागलेली आग विझवण्यात आली. पाऊस थांबल्यानंतर वेगवेगळ्या भागांतून झाडे कोसळल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. अग्निशमन दलाने रातोरात ही झाडे, फांद्या बाजूला सारण्याचे काम हाती घेतले. गंगापूर रस्ता, आडगावचे वैद्यकीय महाविद्यालय, जयभवानी रस्ता, जेलरोडवरील पिंटो कॉलनी, त्र्यंबक रस्त्यावरील आयटीआय सिग्नल, प्रताप चौक आदी भागांत झाडे कोसळल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले. वाहनधारकांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागल्याचे पाहावयास मिळाले. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महापालिका आणि महावितरण कंपनीने मान्सूनपूर्व कामे केल्याचे दावे केले होते. पहिल्याच पावसात ते फोल ठरले. अनेक ठिकाणी वीजतारांवर झाडे पडल्याने आणि अन्य काही तांत्रिक कारणाने वीजपुरवठा खंडित झाला. रात्री पाऊस झाल्यामुळे प्रमुख रस्ते तसेच इतरत्र साचलेल्या पाण्याचा शहरवासीयांना त्रास झाला नाही, मात्र गटारी तुंबल्याने सांडपाणी थेट गोदा पात्रात आल्याची तक्रार केली जात आहे.

सांडपाणीमिश्रित पाण्यात भाविकांचे स्नान

गोदावरीलगतच्या गटारींची स्वच्छता झाली नसल्याने पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे वहन झाले नाही. गटारींच्या ढाप्यांमधून ठिकठिकाणी सांडपाणी बाहेर येऊन ते गोदा पात्रात मिसळल्याची तक्रार गोदाप्रेमी नागरी समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी केली. या पाण्यामुळे गोदावरी काठावर दरुगधी पसरली. अधिक मासामुळे रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गुरुवारी सकाळी सांडपाणीमिश्रित पाण्यात त्यांना स्नान करण्याची वेळ आल्याचे जानी यांनी सांगितले. महापालिकेची कार्यशैली त्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

जिल्ह्य़ात १३७ मिलिमीटर पाऊस

नाशिक जिल्ह्य़ात २४ तासात १३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नाशिकमध्ये ३०, दिंडोरी २९, देवळा १६, येवला आणि सिन्नर प्रत्येकी ५, चांदवड १२, कळवण ८, नांदगाव ११, बागलाण ५.५, सिन्नर ५ असा पाऊस झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.