धरणांमध्ये ७८ टक्के जलसाठा, शेतीलाही काही पाणी मिळणार

नाशिक : वातावरणातील बदलामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असताना या काळात भेडसावणारी पाणीटंचाईची तीव्रता या वर्षी काहीशी कमी जाणवणार असल्याचे चित्र आहे. कारण फेब्रुवारीच्या मध्यावर जिल्ह्य़ातील लहान-मोठय़ा २४ धरणांमध्ये ५१ हजार ५८४ दशलक्ष घनफूट अर्थात ७८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी हा जलसाठा निम्म्याने कमी म्हणजे २४ हजार ७७७ दशलक्ष घनफूट म्हणजे ३८ टक्के होता. धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असल्याने पिण्याच्या पाण्याची गरज सहजपणे भागविता येईल. शेतीलाही काही अंशी पाणी मिळणार आहे.

फेब्रुवारीत धरणांमध्ये इतका जलसाठा असण्याची ही काही वर्षांतील पहिलीच वेळ आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकला वारंवार टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पावसाच्या कमी-अधिक प्रमाणामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. कमी पावसामुळे मागील उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके सर्वत्र सहन करावे लागले. टँकरची संख्या कमालीची विस्तारली होती. मनमाडसारख्या शहरात महिन्यातून एकदा नळाने पाणीपुरवठा झाला होता. या उन्हाळ्यात मात्र वेगळे चित्र राहणार आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून जिल्ह्य़ातील सर्व धरणांमध्ये कमी-अधिक प्रमाणात का होईना जलसाठा आहे. जिल्ह्य़ात एकूण २४ धरणे असून त्यांची एकूण ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफूट इतकी क्षमता आहे. सध्या या धरणांमध्ये ५१ हजार ५८४ दशलक्ष घनफूट (७८ टक्के) पाणी आहे. पालखेड धरण समूहात पालखेड, करंजवण, वाघाडचा समावेश होतो. या समूहात सध्या ५६३३ दशलक्ष घनफूट म्हणजे ६८ टक्के जलसाठा आहे. याव्यतिरिक्त ओझरखेड (१६८२), पुणेगाव (४३४), तीसगाव (३२९), दारणा (६०९०), भावली (१३५४), मुकणे (६०४०), वालदेवी (९७७), कडवा (१०७१), नांदुरमध्यमेश्वर (२५३) असा जलसाठा आहे. गिरणा खोरे धरण समूहात १७८४४ दशलक्ष घनफूट (७७ टक्के) जलसाठा आहे. यामध्ये चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरणाचा अंतर्भाव होतो.

गिरणा धरणात सर्वाधिक म्हणजे १३ हजार ९४८ दशलक्ष घनफूट पाणी आहे. पुनद प्रकल्पात १२८३ तर माणिकपुंजमध्ये २२२ दशलक्ष घनफूट पाणी आहे. गतवर्षी जलसाठय़ाचे प्रमाण निम्म्याने कमी होते. सर्व धरणांमध्ये २४ हजार ७७७ दशलक्ष घनफूट पाणी होते. या वर्षी हे प्रमाण २४ हजार ७७७ दशलक्ष घनफूटने अधिक आहे. समाधानकारक पाणी असल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीची निकड भागवणे शक्य होणार आहे.

नाशिक शहरालाही दिलासा

नाशिक शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात सध्या एकूण आठ हजार दशलक्ष घनफूट म्हणजे ७८ टक्के पाणी आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण पाच हजार ९२८ (५७ टक्के) होते. उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात शहरात पाणी कपात लागू करावी लागली होती. या समूहात गंगापूर, काश्यपी, गौतमी, गोदावरी प्रकल्पांचा समावेश होतो. यामध्ये सध्या अनुक्रमे ४२२२, १७४४ आणि ६६२ असा जलसाठा आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा शहरात टंचाई किंवा कपातीला तोंड द्यावे लागणार नसल्याची स्थिती आहे.