टंचाईने होरपळणाऱ्या मनमाडकरांवर परतीचा पाऊस धो धो कोसळला. शहरातून जाणाऱ्या दोन्ही नद्यांना पूर आले. परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असतानाही मनमाडकरांच्या घरात मात्र आजही १६ दिवसांआड नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सुमारे २० दिवस परतीच्या पावसाने शहर परिसरांत धुमाकूळ घातला. पांझण नदीवरील वागदर्डी धरण तसेच रामगुळणा नदीवरील रेल्वेचा महादेव बंधारा तुडुंब भरून वाहत आहेत. त्यातून दररोज लक्षावधी लिटर पाणी वाहून जात आहे. दोन्ही नद्यांना तीन दिवसांपूर्वी महापूर आला होता. २४ वर्षांत पहिल्यांदाच या दोन्ही नद्यांना इतके पाणी आलेले मनमाडकरांना पाहण्यास मिळाले. पांझण आणि रामगुळणा नद्यांचा उगम  पश्चिमेकडे असून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या या नद्यांचे पाणी अडविण्यासाठी मनमाड शहर किंवा त्याच्या पूर्व बाजूला कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे पाणी वाहून पुढे जात आहे. निसर्गाने या वर्षी भरभरून पाण्याचे दान पदरात घातले, पण मनमाडकरांची ओंजळ मात्र मोठी होऊ शकली नाही.

मनमाड  शहराच्या दत्त मंदिर रस्त्याजवळ पांझण आणि रामगुळणा या नद्यांचा संगम आहे. या नद्यांवरील महादेव बंधारा आणि वागदर्डी धरण भरल्यानंतर पाणी पुढे वाहून जात आहे. १० ते ११ महिन्यांपासून सातत्याने पालखेडच्या आवर्तनाचे पाणी मिळण्याची चातकाप्रमाणे वाट पाहाणाऱ्या मनमाडकरांना आज मात्र पाटोदा येथील साठवणूक तलाव, वागदर्डी धरण, रेल्वेचा महादेव बंधारा हे सर्व जलसाठे भरभरून वाहत असल्याचे समाधान असले तरी प्रत्येकाच्या घरात मात्र पाणीटंचाईची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आजही १६ दिवसांआड फक्त एक वेळ एक तास नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

परतीच्या पावसाने धरणे तुडुंब झाल्यानंतर जलपूजनप्रसंगी २० दिवसांपूर्वी पालिका प्रशासनातर्फे मनमाडकरांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; परंतु विधानसभा निवडणूक, दिवाळीची सुट्टी आणि त्यानंतर परतीच्या मुसळधार पावसामुळे आलेला महापूर यात प्रशासन अडकले. त्यामुळे आश्वासन हवेतच राहिले. शहराला सर्वच जलस्रोतांतून आणि सध्याच्या जलसाठय़ांमधून उपलब्ध असलेल्या पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून पुढील दोन ते तीन महिने आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मनमाडकरांची मागणी आहे.

वागदर्डी धरण तुडुंब झाल्यावर वाहून जाणारे पाणी तसेच महादेव बंधाराही दुथडी भरून वाहू लागल्यानंतर रामगुळणा नदीतून वाया जाणारे पाणी जर व्यवस्थित नियोजन करून साठवले असते, तर २० दिवसांत सुमारे १०० दलघन फूट पाणीसाठा झाला असता, असे शहरातील अभियंत्यांचे मत आहे. हा साठा सध्या वागदर्डी धरणांत जेवढे पाणी आहे तेवढा असून हे पाणी शहराला सध्याच्या व्यवस्थेत आणखी आठ महिने पुरू शकले असते; पण त्याचे गांभीर्य कोणासही नाही.

उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन शहराला लवकरच पुढील काही महिन्यांसाठी आठ दिवसांआड एक वेळ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे – डॉ. दिलीप मेनकर (मुख्य अधिकारी, पालिका)

मनमाडमधून पूर्वेकडे वाहून जाणाऱ्या पांझण नदीतील पाणी साठय़ासाठी यापुढील काळात ठोस उपाययोजना करून योग्य प्रकल्प राबविण्यात येईल – सुहास कांदे (आमदार)

बाहेर धो धो पाऊस, बाजूला नदीतून वाया जात असलेले पाणी, परंतु घरांत मात्र पाण्याच्या टाक्या, हंडा, कळशी रिकामी, असे आमच्या घरांमध्ये ऐन दिवाळीत चित्र होते. किमान यापुढील काळात तरी पालिकेने सात दिवसांआड पाणीपुरवठा करावा. – माधुरी कदम (गृहिणी)