सोशल नेटवर्किंग फोरमच्या पुढाकारातून माळेगावात पाणी योजना साकार

मागील वर्षीच्या भीषण दुष्काळात पाच गावांना टंचाईमुक्त केल्यानंतर सोशल नेटवर्कीग फोरमच्या पुढाकारातून आणि शासकीय विद्या निकेतन शाळेच्या (नाशिक-धुळे) माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून ऐन उन्हाळ्यात आणखी एका गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यात यश आले आहे. त्यांनी गावात पाणी योजना राबविल्याने डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी दीड किलोमीटर पायपीट करणाऱ्या माळेगावमधील महिलांना दिलासा मिळाला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माळेगाव छोटय़ा टेकडीवर वसलेले आहे. टेकडीपासून खाली दीड किलोमीटर अंतरावर विहीर आहे. ग्रामपंचायतीमार्फत शासनाची एक योजना येथे राबविली गेली होती. परंतु, ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याने योजना  पूर्णत्वास गेली नाही.  विहिरीतून पाणी काढताना गतवर्षी एका शाळकरी मुलीचा मृत्यूही ओढावला. पण, जगण्यासाठी आवश्यक पाण्यासाठी असलेली लढाई सुरूच राहिली. ग्रामस्थांनी पाच महिन्यांपूर्वी पाणी प्रश्न फोरमसमोर मांडला होता.  या गावाला फोरमच्या सदस्यांनी जेव्हा भेट दिली, तेव्हा हा प्रश्न सुटण्यासारखा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

विहिरीतील पाणी जलवाहिनीद्वारे आणले आणि गावातील चार ते पाच ठिकाणी साठवून ठेवले तर प्रत्येकाच्या दारात पाणी जाईल. ही कल्पना सुचली. यासाठी सर्वप्रथम ग्रामसभा घेऊन रुपरेषा निश्चित करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांचे श्रमदान, ग्रामपंचायतीची साठवणूक टाकी आणि सोशल नेटवर्किंग फोरमची जलवाहिनी, वीज पंप आणि अन्य कामांसाठी निधी संकलन जबाबदारी निश्चित करण्यात आली. मार्च महिन्यात या कामाला सुरूवात झाली. सर्वानी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या. श्रेयवाद-राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावाने साथ दिली आणि अवघ्या दीड महिन्यात गावातील टाकीत पाणी पडले. गत वर्षीप्रमाणे पाच लाख रुपयांत अजून एक गावाची तहान भागविण्यात यश आल्याची माहिती फोरमचे प्रमुख प्रमोद गायकवाड यांनी सांगितले.

एखाद्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन एका संपूर्ण गावाचा पाणी प्रश्न सोडवावा ही अनोखी घटना आहे. या निधी संकलनात फोरमचे मार्गदर्शक व जळगाव महापालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी महत्वाची भूमिका बजावली. शुक्रवारी सकाळी दहा वाजता गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण होत आहे. माळेगाव ग्रामपंचायत येथे होणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन फोरमने केले आहे.

मदतीच्या बळावर योजना यशस्वी

सोशल फोरम जलअभियानांतर्गत माळेगावचा पाणी प्रश्न सोडविण्यास विद्या निकेतन परिवाराची भरीव मदत झाली. या शाळेच्या माजी विद्यार्थी परिवाराने आर्थिक निधीची जबाबदारी घेतली. अंदाजे पाच लाख रुपये खर्चाच्या या योजनेतील काही भाग ग्रामस्थांनी उचलला. इतकेच नव्हे तर, श्रमदानही केले. उर्वरित निधीतील काही रक्कम समाज माध्यमातून उभी झाली तर दीड लाख रुपये विद्या निकेतन परिवाराने जमा केले. या सर्वाच्या मदतीच्या बळावर अनेक वर्षांपासून दीड किलोमीटरवरील टेकडीच्या खालील विहिरीतून पहाटे डोक्यावर तीन तीन हंडे आणणाऱ्या माळेगावच्या महिलांचे कष्ट संपुष्टात आले आहे.