महावीर जयंतीपासून जैन समाजाचा उपक्रम

भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील सकल जैन समाजाची सामाजिक बांधिलकी नाशिककरांना अनुभवयास मिळाली. जिल्ह्य़ातील टंचाईच्या पाश्र्वभूमीवर नेहमीचा बडेजाव आणि भपका यांना फाटा देत मंगळवारी जयंतीनिमित्त सकाळी अत्यंत साधेपणाने शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेतूनही पाणी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच संकलित झालेल्या निधीचा वापर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १० पाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात येणार आहे. चाराटंचाईच्या समस्येमुळे जिल्ह्य़ातील चार गोशाळांना चारा पुरविण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत या विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला.

महावीर जयंतीनिमित्त दहीपूल परिसरातील जैन मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेचा समारोप चोपडा लॉन्स परिसरात झाला. या शोभायात्रेत पाणी वाचवा, बेटी बचाव यांसह अन्य काही सामाजिक संदेशांवर भर देण्यात आला. दुष्काळ आणि टंचाईमुळे शोभायात्रेवर विनाकारण होणारा खर्च टाळण्यात आला.   सामाजिक परिस्थितीचे भान ठेवत विधायक कामांना कशी मदत करता येईल हे पाहण्यात आले. आदिवासीबहुल परिसरात जाणवणारी तीव्र पाणीटंचाई, त्यातून दोन जणांचा गेलेला बळी पाहता जैन बांधवांनी सर्व कार्यक्रमांचे स्वरूप मर्यादित ठेवत शिल्लक राहिलेल्या पैशांचा विनियोग आदिवासी पाडय़ांवर टँकरने पाणीपुरवठय़ासाठी करण्याचे ठरविण्यात आले. एका टँकरसाठी एक हजार रुपये खर्च गृहीत धरून टंचाईग्रस्त भागातील पाण्याची मागणी लक्षात घेत समाज बांधवांना निधी संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मंगळवापर्यंत या आवाहनाला प्रतिसाद मिळून ३०० टँकरसाठी नोंदणी पूर्ण झाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १० पाडय़ांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येणार असून त्या ठिकाणी पाणी साठविण्यासाठी टाक्या बसविण्यात आल्या आहेत.

पुढील दोन महिने हा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. तसेच जनावरांना चारा उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्य़ातील चार गोशाळांना चारा दिला जाणार आहे.  मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापौर अशोक मुर्तडक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्र्यंबकच्या दिशेने पाण्याचा टँकर व चाराने.