जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित
निफाड तालुक्यातील कोळगाव हे तसे सर्व दृष्टीने दुर्लक्षित गाव. ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीत अशुद्ध पाण्यामुळे तरुणाईसह ज्येष्ठ व्यक्तींना मूतखडय़ाच्या विकाराने ग्रासल्याचे निदर्शनास आले. संबंधिताच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सुश्रूत ग्रुप ऑफ फाऊंडेशनने पुढाकार घेऊन गावासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करत दुष्काळी स्थितीत एक वेगळाच आदर्श समोर ठेवला आहे. एटीएममधून ग्रामस्थांना आता शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे.
धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सर्वत्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या स्थितीत जिथून पाणी मिळेल, तिथून ते घेणे इतकाच काय तो पर्याय ग्रामीण भागात आहे.
पाणीटंचाईच्या सावटात कोळगाव वेगळ्याच संकटात सापडले होते. निफाड तालुक्यात असणारे हे गाव येवला विधानसभा मतदारसंघात येते. लोकप्रतिनिधींनी त्याकडे फारसे गांभीर्यपूर्वक पाहिले नाही. त्यामुळे कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांची अशुद्ध पाणीपुरवठय़ातून सुटका झाली नाही. मध्यंतरी गावात आयोजित आरोग्य शिबिरात अशुद्ध पाणीपुरवठय़ामुळे निर्माण झालेले गंभीर स्वरूपाचे प्रश्न समोर आले. २० ते २५ वयोगटांतील तरुण असो की ५० वर्षांपुढील व्यक्ती असो, बहुतेकांना मूतखडय़ाचा विकार जडला होता. अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या आजाराचे रुग्णही मोठय़ा संख्येने आढळले. त्यामुळे गावात उपलब्ध होणाऱ्या पाण्याची तपासणी केली असता ते अशुद्ध असल्याचे स्पष्ट झाले. पाण्यातील टीडीएसचे प्रमाण २४०० इतके होते. पाणी अतिशुद्ध केल्याशिवाय आरोग्याचे प्रश्न मार्गी लागणार नसल्याचे सुश्रूत फाऊंडेशनच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या प्रकल्पाच्या अनुषंगाने काम सुरू केले.
फाऊंडेशनच्या उभारणीतून साकारलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते आणि फाऊंडेशनच्या प्रमुख अमृता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रकल्पात एक हजार लिटर पाणी शुद्ध होते.
दहा हजार लिटर पाण्याची टाकी प्रकल्पासाठी खास बसविण्यात आली. शुद्ध पाणी वितरणासाठी पाण्याचे एटीएम बसविण्यात आले. १०० ग्रामस्थांनी एटीएम घेतले आहे. १५० रुपयांचे रीचार्ज केल्यावर महिनाभर त्यांना शुद्ध पाणी या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. आणखी ३०० ग्रामस्थ या प्रकल्पाचा लाभ घेणार असल्याचे पवार यांनी नमूद केले. शुद्ध पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.