News Flash

मुकणे धरण योजनेतून पाणीपुरवठय़ाला सुरुवात

चाचणी, परीक्षणाद्वारे टप्प्याटप्प्याने विस्तार

चाचणी, परीक्षणाद्वारे टप्प्याटप्प्याने विस्तार

बहुप्रतीक्षित मुकणे धरण योजनेतून पाथर्डी परिसरातील काही भागात पाणीपुरवठय़ाला सुरुवात झाली असून दोन जलकुंभ भरून चाचणी, निरीक्षणाचे काम प्रगतिपथावर आहे. पहिल्या दिवशी जवळपास नऊ एमएलडी पाणी पुरविले गेले, तर दुसऱ्या दिवशी त्यात आणखी वाढ झाली आहे. जुनी प्रणाली नव्या योजनेत समाविष्ट करण्याचे काम टप्प्याटप्प्याने होईल. ते पूर्णत्वास गेल्यानंतर नवीन नाशिक विभागात सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

शहरासाठी मुकणे धरणातून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यापासून मिळणारा लाभ प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यातील शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन या योजनेची संकल्पना मांडली गेली होती. या योजनेंतर्गत मुकणे धरणातून दररोज ४०० दशलक्ष लिटर पाणी उचलण्याचे नियोजन आहे. ३० महिन्यांत प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते; परंतु कामासही विलंब झाला. यामुळे खर्चातही वाढ झाली. या योजनेंतर्गत मुकणे धरण ते पाथर्डी ट्रक टर्मिनस येथे जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत वाहिनी तसेच पाथर्डी येथे पहिल्या टप्प्यात १३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात नवीन नाशिक विभागातील पाथर्डी, पिंपळगाव, वडनेर, इंदिरानगर, राजीवनगर, वासननगर, चेतनानगर, दीपालीनगर, वडाळा, अशोका मार्ग ते गांधीनगपर्यंतच्या भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.

गुरुवारी त्यात आणखी वाढ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिथे जिथे प्रणाली यशस्वीपणे बदलली जात आहे, तिथे मुकणे योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पाथर्डी, वासननगर, चेतनानगर, इंदिरानगरसह आसपासचा परिसर अनेक वर्षांपासून पाणीपुरवठय़ातील अडचणींना तोंड देत आहे. एक वेळ होणारा पाणीपुरवठा सुरळीत नसतो. काही भागात रात्री पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या जातात. शहरातील बहुतांश भागात दोन वेळा पाणीपुरवठा होत असताना हा परिसर एकवेळच्या पाणीपुरवठय़ाच्या प्रतीक्षेत राहिला होता. मुकणे धरण योजनेमुळे यावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणी प्रक्रिया पूर्णत्वास जाण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे.

महाराष्ट्रदिनी अर्थात बुधवारी मुकणे धरण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. पाथर्डी भागातील दोन जलकुंभ नवीन योजनेशी जोडले गेले. या जलकुंभावरून पाथर्डी आणि परिसरात पाणीपुरवठा होतो. आधी पाणी सोडून वाहिन्यांची स्वच्छता करण्यात आली. नंतर नऊ एमएलडी पाणीपुरवठा केला गेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 9:25 am

Web Title: water resource management 14
Next Stories
1 भाजप-शिवसेनेची आता महापालिकेत कसरत
2 जिल्ह्य़ाच्या विकासासाठी राजकीय नेत्यांची ‘मिसळ पार्टी’!
3 थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव
Just Now!
X