सिडकोतील पाणीटंचाईचे पालिके च्या सभेत पडसाद

नाशिक : सिडकोतील अनेक भागांत काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होण्यामागे पाण्याची पळवापळवी आणि दोन अभियंत्यांमधील वाद कारणीभूत ठरल्याचा आरोप करत नगरसेवकांनी ऑनलाइन सर्वसाधारण सभेत महापौरांसह प्रशासनाला धारेवर धरले. याच प्रश्नावरून शिवसेनेच्या नगरसेविका किरण दराडे-गामणे यांनी पाथर्डी फाटा येथील जलकुंभावर धडक मारून आंदोलन केले. कृत्रिम पाणीटंचाईवरून सभेत रणकंदन उडाले. या संदर्भात मंगळवारी तातडीने बैठक बोलावून तोडगा काढण्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी मान्य केले.

सिडकोतील अनेक प्रभागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सिडको भागासाठी राखीव असणारे पाणी इंदिरानगरसह अन्य भागात दिले जाते. त्यामुळे सिडकोवासीयांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या घटनाक्रमाचे पडसाद सोमवारी महापालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटले. प्रभाग २७, २८ आणि २९ या भागात अतिशय अल्प स्वरूपात पाणीपुरवठा होत आहे. अश्विननगर, मोरवाडी, पाथर्डी फाटा आदी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त नगरसेविका किरण दराडे-गामणे यांनी पाथर्डी फाटा येथील जलकुंभावर धडक दिली.

सिडको विभागाचे उपअभियंता गोकुळ पगारे दबाव आणून पाणीपुरवठा सिडकोकडून इंदिरानगर भागात वळवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अधिकारी महापौरांचा दबाव असल्याचे सांगतात, याकडे लक्ष वेधण्यात आले. ऑनलाइन सभेत बोलण्याची संधी मिळावी म्हणून गामणे यांनी वारंवार विनंती केली. परंतु महापौरांनी ती अमान्य केली. पाणीटंचाईवरून सिडकोतील नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.

ऑनलाइन सभेचे कामकाज सुरू असताना सिडकोतील काही नगरसेवक महापौर ज्या दालनात बसले होते, तिथे धडकले. अभियंत्यांमधील वादात सिडकोत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप केला. मुकणे धरणातून सिडकोवासीयांसाठी पाणी आरक्षित करण्यात आले. आता ते पाणी इंदिरानगरसह द्वारकापर्यंत वितरित केले जाते. अभियंत्यांमधील वादाचा फटका सिडकोवासीयांना बसत आहे. पाणी भरपूर असूनही प्रशासन नियोजनात अपयशी ठरल्याची तक्रोर सुधाकर बडगुजर यांनी के ली. चेहेडी पंम्पिग स्टेशन सक्षम केल्यास अन्य भागाचा पाणी प्रश्न सुटेल. सिडको विभागात कनिष्ठ अभियंत्यांकडे वरिष्ठ पदांचा प्रभारी स्वरूपात अधिभार दिला गेला आहे. सहा महिने ते जबाबदारी सांभाळू शकतात. यामुळे पाणीपुरवठय़ाच्या वितरणात अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याची अन्य भागातील पळवापळवी थांबवून सिडकोत सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

या विषयात कोणी अभियंता दोषी आढळला तर त्यास निलंबित केले जाईल. तसेच मंगळवारी संयुक्त बैठक घेऊन पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन महापौरांनी दिल्यावर नगरसेवक माघारी फिरले.

नाशिक रोडच्या जलवाहिनीसाठी १९ कोटींचा निधी

नाशिक रोड भागात पाणीपुरवठय़ाच्या अनेक तक्रारी आहेत. मध्यंतरी महापौरांच्या दौऱ्यादरम्यान नगरसेवकांनी त्याकडे लक्ष वेधले होते. पाणीपुरवठय़ाची भिस्त असणारी मुख्य जलवाहिनी जुनाट आणि कमी क्षमतेची आहे. त्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पाश्र्वभूमीवर, बारा बंगला ते गांधीनगर आणि नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी १९ कोटींच्या खर्चाला सभेत मान्यता देण्यात आली. तसेच शहरातील १३ नव्या जलकुंभांच्या कामांना मंजुरी देण्यात आली.