इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस; गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने घट; खरिपाचे नियोजन विस्कटण्याच्या मार्गावर

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात मंगळवारी सकाळपासून संततधार सुरू होऊन दुपारनंतर जोर वाढल्याने ग्रामीण भागात जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. दोन-तीन तालुके वगळता इतरत्र तालुके हे कोरडेच राहिले आहेत. त्यामुळे या तालुक्यातील खरिपाच्या पेरण्याचे नियोजन विस्कटण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

जूनमध्ये सलग चार आठवडे हुलकावणी देणाऱ्या पावसाचे जूनच्या अखेरच्या सप्ताहात संथपणे आगमन झाले. अनेकदा प्रारंभीच कोसळणारा पाऊस दोन-तीन निवडक तालुके वगळता कुठे बघायला मिळालेला नाही.  इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांत संततधार पाऊस सुरू आहे. इगतपुरीच्या घाटमाथ्यावरील घोटी, इगतपुरी, भावली, मानवेढे, काळूस्ते, वैतरणा, वाडीवऱ्हे, मोडाळे, शिरसाठे, मुंढेगाव, कुशेगाव, मुरंबी ठिकाणी पावसामुळे शेती जलमय झाली. पावसामुळे काही ठिकाणी आवण्यादेखील सुरू झाल्या आहेत.रखडलेल्या पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात दिवसभर पावसाची ये-जा सुरू होती. हे दोन तालुके वगळता त्याचे ठळक अस्तित्व इतरत्र अधोरेखित झाले नाही. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत जिल्ह्य़ात ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात इगतपुरी २१, त्र्यंबकेश्वर २८, सुरगाणा १४, येवला पाच मिलिमीटरचा समावेश आहे. मध्यंतरी हजेरी लावणाऱ्या पावसाने रखडलेली शेतीची कामे मार्गी लागण्याची आशा पल्लवीत झाली होती. परंतु तो अंतर्धान पावला. आजही जेमतेम ३० टक्क्यांच्या आसपास खरिपाची पेरणी झाली आहे.

अनेक गावांमधील पाणीटंचाईचा प्रश्नही सुटलेला नाही. दमदार स्वरूपात पाऊस होत नसल्याने खरिपाच्या पेरण्या तरी कशा करायच्या, या चिंतेत शेतकरी आहेत.

आतापर्यंत केवळ १६.९५ टक्के पाऊस

गतवर्षीच्या तुलनेत संपूर्ण जून महिना दमदार पावसाच्या प्रतीक्षेत गेला, तर जुलै महिन्यास सुरूवात होऊनही पावसाचा जोर नाही.  मागच्या वर्षी एकूण पाच हजार ६७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. आज ही आकडेवारी २५७७ मिलिमीटपर्यंत खाली आली आहे. म्हणजे आतापर्यंत जिल्ह्य़ात केवळ १६.९५ टक्के पाऊस झाला आहे.  त्यात इगतपुरी ६६४, पेठ २९०, त्र्यंबकेश्वर २३९, नाशिक १३७, बागलाण १४१, येवला १७४, सिन्नर १०५, सुरगाणा १३५, मालेगाव १५० मिलीमीटरचा समावेश आहे. नांदगाव तालुक्यात केवळ ६५, निफाड २४, दिंडोरीत ६२ मिलिमीटर पाऊस झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नाशिक, पेठ या तालुक्यात तुरळक सरी कोसळल्या. दिंडोरी, निफाड, सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, बागलाण आदी तालुके कोरडे राहिले असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.