बचतीबरोबर पाणी लेखा परीक्षणाची तयारी

धरणांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या नाशिक जिल्ह्य़ात उन्हाळ्यात मात्र अनेक गावांना टंचाईला तोंड द्यावे लागते. वर्षांनुवर्ष पाण्यासाठी तहानलेल्या गावांचे चित्र बदलत नाही. टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी आजवर जे काम शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थांना जमले नाही, त्याकरिता बागलाण तालुक्यातील टेंभे गावच्या शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.  वेगवेगळ्या उपक्रमातून पाणी बचतीचे पाठ गिरवत हे विद्यार्थी जलदूत म्हणून कार्यरत झाले आहेत.

जिल्ह्य़ाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०१३.३९ मिलीमीटर आहे. पावसाचा विचार केल्यास स्थिती समाधानकारक आहे. परंतु, काही भागात वेगळी स्थिती आहे. सटाणा तालुक्यातील पश्चिम घाट पर्वतरांगेत मोसम नदी आहे. या ठिकाणी हरणबारी धरण बांधण्यात आले आहे. चार ते पाच वर्षांपासून तालुक्यात पुरेसे पर्जन्यमान नाही. परिसरातील भूजल पातळी खालावलेली आहे. यामुळे काही गावांना सातत्याने टंचाईला तोंड द्यावे लागते. यातील एक म्हणजे टेंभे गाव. ही बाब लक्षात घेत गावातील जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण सेवा योजना विभागाचे प्रकल्प समन्वयक जगदीश ठाकूर यांच्या मदतीने पाणी बचत करण्या संदर्भात काय करता येईल यासाठी विविध उपक्रम हाती घेतले.

विद्यार्थ्यांनी शाळा तसेच गावातील पाणी वापर, पर्जन्यमान, पाण्याची गुणवत्ता तपासणी, गळके नळ बदली करणे, कुपनलिका, विहीर आदींचे सर्वेक्षण करत पाणी बचत कशी करता येईल यावर काम सुरू केले आहे.  पर्यावरण सेवा योजना विद्यार्थी गटाने शाळेच्या छतावर भारतीय हवामान खाते प्रमाणित पर्जन्यमापक बसविले.

शाळा परिसरात उपलब्ध पाण्याचा स्त्रोत म्हणजे कूपनलिका. त्यामार्फत पाणी शाळेत वापरायला तर ग्रामपंचायतीमार्फत जलवाहिनीद्वारे पिण्यासाठी पुरविले जाते. मात्र दोन्ही ठिकाणी जुलै ते जानेवारीपर्यंत पाणी पुरते आणि नंतर टंचाई जाणवते.

शाळेतील पिण्याच्या टाकीला बसविलेल्या सहा नळांपैकी  चार नळ गळके आहेत. त्याचे परीक्षण केले असता चार नळांद्वारे एकूण ७, ८१, ०२७ लिटर शाळेच्या २३५ दिवसांत वाया गेल्याचे निष्पन्न झाले. यावर तोडगा म्हणून शाळेचे नळ तातडीने बदलण्यात आले आहे.  दुसरीकडे छतावरील पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याकरिता शाळेच्या इमारतीच्या छताचे क्षेत्रफळ मोजत किती पावसाचे संकलन होईल, याबाबत गणितीय आकडेमोड करत उत्तर काढण्यात आले. हे पाणी साचविण्यासाठी शाळेच्या कूपनलिकेपासून पाच फूट शोषखड्डा तयार करण्यात आला आहे.

अंदाजपत्रक तयार होणार

गावातील पाणी वापराचा अभ्यास करण्यासाठी जलदुतांनी कुटूंब सर्वेक्षण केले. त्याअंतर्गत पाणी प्रश्नावलीद्वारे प्रत्येक घरातून माहिती संकलित केली. गावातील पाणी वापराबाबत नकाशा तयार केला.  समस्या समजून घेण्यासाठी मुलांनी गावात पाण्याची स्थिती काय, पाणी किती दिवस पुरते, गावातील कूपनलिका, विहिरी आदींची माहिती संकलित केली आहे. ऋतुमानानुसार जलस्त्रोताचा अभ्यास करण्यात आला. यासाठी  जीपीएसच्या मदतीने कशी नोंद घ्यायची याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.  माहिती  गटागटाने कार्डशीटवर  लिहिण्यात आली. त्याचा अभ्यास करत पाणी वापराचे अंदाजपत्रक विद्यार्थी तयार करणार आहेत. यासाठी नव्या शैक्षणिक वर्षांत तीनही ऋतुत भूजल अभ्यास करण्यात येणार आहे.