निवडणुकांनंतर पाण्याच्या स्रोतापाठोपाठ राजकीय नेत्यांचा मायेचा पाझरही आटला

तापमानाने उच्चांकी पातळी गाठली असताना ग्रामीण भागात टंचाईचे चटके तीव्रतेने बसत आहेत. शहरात १६ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. महिलांसह चिमुरडय़ांची रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एरवी, निवडणुकांचा हंगाम पाहून सर्वसामान्यांची तहान भागविण्यासाठी सरसावणारी राजकीय मंडळी अंतर्धान पावली आहे. रखरखीत वातावरणात पाण्याचे स्रोत कमी झाले असताना राजकीय मंडळींच्या मायेचा पाझरही आटल्याचे या उन्हाळ्याच्या हंगामात ठळकपणे जाणवत आहे.

ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ासाठी मोठा निधी खर्च करूनही उन्हाळ्यात ग्रामस्थांची भिस्त टँकरवर अवलंबून असते. गतवर्षी समाधानकारक पाऊस होऊनही ते संकट कायम आहे. सध्या जिल्ह्य़ात प्रशासनामार्फत ७६ गावे, ८७ वाडय़ांना ४८ टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

मनमाड शहराला सध्या १६ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी हे पाणी १८ ते २० दिवसांआड मिळायचे. यंदाही तीच परिस्थिती आहे. मनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणात सध्या केवळ १४ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे.

जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी २० मेपर्यंत दुसरे आवर्तन सोडण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मनमाडसह येवला शहराच्या पिण्याच्या पाण्याची महिनाभरासाठी तजवीज होईल.

एकदा नळाद्वारे येणारे पाणी १५ दिवस कसे वापरायचे हा प्रश्न असतो. इतर शहरात पाणीपुरवठय़ाची वेगळी स्थिती नाही. ज्या गाव किंवा पाडय़ात टँकरची व्यवस्था होत नाही, त्या ठिकाणी महिलांसह चिमुरडय़ांना जिथून पाणी मिळेल, तिथून ते डोईवर आणावे लागते.  विधानसभा, लोकसभा, नगरपालिका तसेच तत्सम निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, पाणीटंचाईच्या संकटाची दखल घेणारी राजकीय मंडळी निवडणुकीनंतर त्याकडे ढुंकूनही पाहात नाही. नाशिकचे खासदार असो किंवा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  इतर राजकीय पक्षातील प्रमुख मंडळी असो. कोणीही त्यास अपवाद नाही. निवडणुकीत मतांची बेगमी करण्यासाठी बहुतांश इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात स्वखर्चाने टँकर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याप्रमाणे नगरपालिका निवडणुकीवेळी वॉर्डात टँकर सुरू केले गेले.

प्रचारादरम्यान त्या त्या परिसरातील पाणी टंचाईचे संकट सोडविण्याचे आश्वासन देण्यास कोणी विसरले नाही. प्रचार सभा, जाहीरनाम्यांमधून आश्वासनांचा पाऊस पाडला गेला. परंतु, निवडणूक पार पडली  तसे ही आश्वासने हवेत विरली.

संबंधितांची टँकर सुरू करण्याची आस्था केवळ निवडणुकीपुरतीच मर्यादित राहिली. स्वखर्चाने टँकर सुरू करण्यामागे केवळ मतांचे राजकारण असल्याची बाब मतदारांना ध्यानी आले.

मात्र, मनमाडसह पाण्यासाठी तहानलेल्या कोणत्याही गावात सद्य:स्थितीत राजकीय पुढाऱ्याने स्वखर्चाने टँकरने पाणी दिल्याचे आढळत नाही. विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. जनतेतून निवडून येण्याशी तिचा संबंध नसल्याने रिंगणात उतरलेल्या तिन्ही उमेदवारांसाठी पाणीटंचाईचा प्रश्न गौण ठरला आहे, याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

प्रशासनातर्फे ७६ गावे, ८७ वाडय़ांना टँकरने पाणी

गतवेळी समाधानकारक पाऊस होऊनही मेच्या टळटळीत उन्हात टंचाईच्या गर्तेत सापडणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्य़ातील ७६ गावे आणि ८७ वाडय़ांना ४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रशासनाने सहा विहिरींचे अधिग्रहण केले आहे. सर्वाधिक १७ टँकर येवल्यात तर सर्वात कमी दोन टँकर सिन्नर तालुक्यात सुरू आहेत. येवला तालुक्यातील ३४ गावे, १९ पाडय़ांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. मालेगाव तालुक्यातील सात गावे, २२ वाडय़ांना सात टँकर, नांदगाव तालुक्यात पाच गावे, २६ वाडय़ांना तीन, बागलाण तालुक्यात १९ गावे, १ वाडी यांना १४ टँकर आणि देवळा तालुक्यात एका गावाला एक टँकरने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती टंचाई शाखेने दिली. बैलगाडीद्वारे कोणत्याही भागात पाणी पुरविले जात नाही. पाणीटंचाई निवारणार्थ सहा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उर्वरित ११ तालुक्यांमध्ये एकही टँकर सुरू केला गेलेला नाही.