16 January 2019

News Flash

पावसाची प्रतीक्षा अन् टंचाईचे संकट गडद

पावसाचे वेळेवर आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता.

मोसमी पावसाने राज्यात सर्वत्र सलामी दिली असली तरी नाशिक जिल्ह्य़ात मात्र त्याचे आगमन झालेले नाही. ढगाळ वातावरण निर्माण झाले की पावसाची चिन्हे दिसू लागतात, परंतु पुन्हा ऊन पडून आशेचे रूपांतर निराशेत होते. 

राज्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी नाशिक जिल्हा मात्र अद्याप त्याच्या प्रतीक्षेत आहे. तापमानाचा पारा ३३ अंशापर्यंत खाली उतरला आहे. मृग नक्षत्राचे पहिले काही दिवस कोरडे गेले. जिल्ह्य़ातील सहा धरणे कोरडीठाक पडली आहेत. नऊ धरणांमध्ये १० टक्क्य़ांहून कमी पाणी शिल्लक आहे. या घटनाक्रमाने पावसाचे आगमन लांबल्यास टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

पावसाचे वेळेवर आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. अंदाजाप्रमाणे राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे तो लवकरच नाशिकमध्ये दाखल होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती, परंतु अद्याप नाशिक जिल्हा मोसमी पावसाच्या प्रतीक्षेतच आहे. शेतकऱ्यांसह सर्वाचे आकाशाकडे डोळे लागले आहेत.

मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पण, दुपापर्यंत तो बरसला नाही. उकाडय़ाची तीव्रता काही अंशी कमी झाली. मागील काही दिवसात तापमान सहा ते सात अंशांनी कमी होऊन ३३ वर आले आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली आहे.

मागील काही वर्षांत पावसाचे वेगवेगळे अनुभव आल्याने या हंगामात काय होईल, याची प्रत्येकाला धास्ती आहे.

पाण्याअभावी ग्रामीण भागात टंचाईचे संकट भीषण स्वरूप धारण करीत आहे. पावसाला सुरुवात होत नसल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे.

टंचाई शाखेने दिलेल्या माहितीनुसार सध्या १०३ गावे आणि १६५ वाडय़ांना ७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागातून टँकरची मागणी वाढत आहे. टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन नव्याने १२ गावे आणि ४६ वाडय़ांसाठी टँकरला मान्यता देण्यात आली. टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागल्याने उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर व्हावा, याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

सहा धरणे कोरडी, नऊमध्ये जेमतेम पाणी

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सद्य:स्थितीत १३६५ दशलक्ष घनफूट म्हणजे २४ टक्के, तर याच समूहातील कश्यपी धरणात ६७४ दशलक्ष घनफूट (३६ टक्के) जलसाठा आहे. हे पाणी जुलै अखेपर्यंत नाशिककरांची तहान भागवू शकते. याचा अंदाज घेऊन  उन्हाळ्यात पाणीकपात केली गेली नव्हती. गरज भासल्यास अधिकचे काही दिवस पाणी उपलब्ध करण्याची तयारी पाटबंधारे विभागाने ठेवली आहे. नाशिक शहर वगळता ग्रामीण भागातील धरणांची मात्र अशी स्थिती नाही. भावली, मुकणे, वालदेवी, नागासाक्या, भोजापूर आणि माणिकपुंज ही धरणे कोरडीठाक पडली आहेत. गौतमी गोदावरी (१७६ दशलक्ष घनफूट), करंजवण (५६०), वाघाड (८०), पुणेगाव (४७), तिसगाव (१३), कडवा (१७४), हरणबारी (३५), केळझर (१०), गिरणा (१८१०) असा दोन ते दहा टक्क्य़ांच्या दरम्यान जलसाठा आहे. या धरणांमध्ये जेमतेम पाणी असून पावसाला सुरुवात न झाल्यास ती देखील कोरडीठाक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्वरित धरणांची स्थिती तुलनेत बरी आहे. त्यामध्ये पालखेड (१८५ दशलक्ष घनफूट), ओझरखेड (३२०), दारणा (२१४५), नांदूरमध्यमेश्वर (२४५), चणकापूर (५५२), पुनद (४१५) असा जलसाठा आहे. जिल्ह्य़ातील धरणांमध्ये सध्या एकूण आठ हजार ९१८ दशलक्ष घनफूट म्हणजे १४ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण १३ टक्के होते.

टंचाईग्रस्त गावांचा चढता आलेख

सद्य:स्थितीत जिल्ह्य़ातील १०३ गावे आणि १६५ वाडय़ांना७७ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. नव्याने १२ गावे आणि ४६ वाडय़ांसाठी १३ टँकर मंजूर झाले आहे. सर्वाधिक टँकर येवला तालुक्यात आहेत. तेथील ४२ गावांना २४ टँकरने पाणी पुरविले जात आहे. बागलाण तालुक्यात ३१ गावे आणि एका वाडीला १५ टँकरने पाणी पुरविले जात आहे. ग्रामीण भागातून टँकरची मागणी लक्षणीय वाढली आहे. पाऊस लांबल्यास ही संख्या आणखी विस्तारण्याची शक्यता आहे.

First Published on June 13, 2018 1:14 am

Web Title: water scarcity nashik monsoon