वाघदर्डी धरणातील जलसाठा संपला असून मनमाड शहराला पर्यायी पाणीपुरवठा करणाऱ्या पालखेड धरण समूहातही जेमतेम १० टक्के पाणी शिल्लक आहे. मनमाडकरांना या धरण समूहातून मिळणाऱ्या शेवटच्या आवर्तनाविषयी कमालीची अनिश्चितता आहे. त्यामुळे पाऊस येईपर्यंत किंवा पुढील आवर्तनाचे पाणी प्रत्यक्षात धरणात येईपर्यंत मनमाडसाठी आता पाणीबाणी लागू झाली आहे.

सध्याच्या वितरण व्यवस्थेत आययूडीपी आणि ईदगाह विभागात गुरुवारी, त्यानंतर हुडको, शिवाजीनगर भागात जेमतेम पाणीपुरवठा कमी दाबाने होऊ शकणार आहे. त्यातच पाणी मृत साठय़ातील असल्याने कमालीचे गढूळ असून पाण्याच्या वेळेतही कपात करण्यात आली आहे. यानंतर शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे सांगण्यात आले.  पाणी कधी येणार? हा प्रश्न फक्त आपल्या भागात, घरात, कुटुंबातच चर्चेला जात आहे. परंतु याबाबत जाहीरपणे नगरपालिकेला जाब विचारण्याची हिंमत कोणी दाखवत नाही. नगरपालिका प्रशासनही सुस्त आहे. पाण्याची नक्की काय परिस्थिती राहणार? याबाबत पालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला अधिकृतपणे काहीही सांगता येत नाही. कोणत्या दिवशी, कोणत्या भागात पाणी सोडले जाणार, ते किती वेळ राहणार आणि ते कधी संपणार, आवर्तन कधी येणार, पुढील पाणीपुरवठा होईल की नाही, याविषयी आमदार, नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकारी काय, नगरसेवकही छातीठोकपणे काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे या भीषण पाणीटंचाईचे गांभीर्य कोणासही राहिले नसल्याचे चित्र आहे.