धरणसाठा ८० टक्क्य़ांवर; पाऊस १७ हजार मिलिमीटर पार

मुसळधार पावसामुळे जिल्ह्य़ातील लहान-मोठय़ा २४ धरणांमधील जलसाठा ८० टक्क्य़ांवर पोहचला आहे. गेल्या वर्षी याच काळात हे प्रमाण ५९ टक्के होते. सद्यस्थितीत १७ धरणे एकतर पूर्ण क्षमतेने भरली किंवा भरण्याच्या मार्गावर आहेत. अकस्मात पाऊस झाल्यास होणारी आवक साठविण्यासाठी धरणात काही जागा गरजेची असते. यामुळे हंगामाच्या अखेपर्यंत जोपर्यंत पाऊस होईल, तोपर्यंत धरणांमधून विसर्ग अनिवार्य ठरणार आहे. अशी परिस्थिती जिल्ह्य़ात निर्माण झाली आहे.

गेल्या आठवडय़ात मुसळधार पावसाने पाच ते सहा तालुक्यांना चांगलेच झोडपले. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरातील धरणे ओसंडून वाहू लागली. २४ तासांत जिल्ह्य़ात ३३२ मिलिमीटरची नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्ह्य़ात १६ हजार ९७२ मिलिमीटर पाऊस झाला.

दिवसभर अनेक भागांत भुरभुर सुरू होती. यामुळे पावसाने १७ हजाराचा मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. गतवर्षी हे प्रमाण निम्मे होते. केवळ नऊ हजार ५६ मिलिमीटर त्यावेळी पावसाची नोंद झाली होती.

महिनाभर दडी मारणाऱ्या पावसाने आधीची सर्व कसर दुसऱ्या महिन्यात भरून काढली. इतका पाऊस झाला की, अनेक धरणे ओसंडून वाहू लागली. तर दुसरीकडे मुसळधार पाऊस होऊन देखील दारणा, गंगापूर, पालखेडसह काही मोठी धरणे पूर्ण भरली गेली नाहीत. ऑगस्टच्या मध्यावर धरण पूर्ण क्षमतेने भरता येत नसल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अकस्मात पाऊस झाला आणि धरण पूर्ण भरलेले असेल तर मोठय़ा प्रमाणात विसर्गाची वेळ येऊ शकते. धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. ते टाळण्यासाठी धरणात काही जागा रिकामी ठेवण्यात येत आहे. पाऊस परतीच्या मार्गावर असताना ती भरली जातात. यामुळे जेव्हा पाऊस पडेल, तेव्हा बहुतांश धरणांमधून विसर्गाची वेळ येणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

धरणांची स्थिती काय ?

चार ते पाच दिवसांत गंगापूर धरणात ९१, दारणा ९०, मुकणे ९३, कडवा ८९, पालखेड ७०, पुनद ७१, चणकापूर ६६ टक्क्य़ांची पातळी कायम राखली गेली आहे. वेळापत्रकानुसार पुढील महिन्यात ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली जातील. यामुळे जोपर्यंत पाऊस सुरू राहील, तोपर्यंत आवश्यकतेनुसार पाणी सोडावे लागणार आहे. आळंदी, वाघाड, वालदेवी, भावली, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे पूर्ण भरलेली आहेत. त्यातून विसर्ग सुरू आहे. तर काश्यपी, गौतमी गोदावरी, करंजवण ही धरणे भरण्याच्या स्थितीत आहेत. त्यामधूनही पाणी सोडले जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा गिरणा धरणातून अद्याप विसर्ग करावा लागलेला नाही. या धरणात ५९ टक्के जलसाठा आहे. सर्व धरणे ओसंडून वाहात असताना माणिकपुंज, नागासाक्या या धरणात मात्र जलसाठा झालेला नाही. लहान-मोठय़ा सर्व धरणांमध्ये सध्या ५३ हजार ५६ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. हे प्रमाण ८१ टक्के आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणांतील एकूण जलसाठा ३८ हजार ४८१ अर्थात ५८ टक्के होता.