नाशिक : पावसाच्या प्रमाणात फारशी वाढ झाली नसली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्य़ातील धरणांतील जलसाठा १६ टक्क्य़ांनी वाढून ३३ टक्क्य़ांपर्यंत पोहोचला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्य़ातील लहान-मोठय़ा २४ धरणांमध्ये २१ हजार ६३८ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. मागील वर्षी हे प्रमाण केवळ १० हजार ९६८ दशलक्ष घनफूट इतके होते. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० हजार दशलक्ष घनफूट इतके जादा पाणी आहे. परंतु, यामध्ये गतवर्षीच्या पावसाचा अधिक्याने हातभार लागला आहे.

धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये लहान-मोठी एकूण २४ धरणे असून त्यांची एकूण जलसाठय़ाची क्षमता ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफुट आहे. नऊ जुलैपर्यंत या धरणांमध्ये २१ हजार ६३८ दशलक्ष घनफुट अर्थात ३३ टक्के जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. गेल्या वर्षी अखेरच्या टप्प्यात मुसळधार पाऊस झाला होता. बहुतांश धरणे तुडूंब भरली. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात बहुतांश धरणांमध्ये पाणी बऱ्यापैकी राहिले. या वर्षी जलसाठय़ात वाढ होण्यात त्याचा हातभार लागला आहे.

गंगापूर धरण समुहाच्या तुलनेत पालखेड आणि गिरणा खोरे धरण समुहात कमी जलसाठा आहे. गंगापूर धरण समूहाची १० हजार ३२० दशलक्ष घनफूट क्षमता असून सध्या त्यात ३५४९ दशलक्ष घनफूट म्हणजे ३४ टक्के जलसाठा आहे. दारणा धरण समुहात एकूण १८ हजार ९०० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या तुलनेत ३६ टक्के म्हणजे सहा हजार ८०० दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. पालखेड धरण समुहाच्या ३२०८ क्षमतेच्या तुलनेत १३२६ अर्थात १६ टक्के जलसाठा आहे. गिरणा खोरे धरण समूहाची २३ हजार ६२ क्षमता आहे. या समुहात सध्या आठ हजार ३०१ दशलक्ष घनफूट पाणी आहे.

धरणनिहाय विचार केल्यास सद्यस्थितीत गिरणा धरणात सर्वाधिक सात हजार २० (३६ टक्के) जलसाठा आहे. तर कोरडे असणारे माणिकपूंज हे एकमेव धरण आहे. पालखेड धरणात २०६ (३२), करंजवण ९२८ (१७), वाघाड १९२ (आठ), ओझरखेड ८५३ (४०), पुणेगाव ६८ (११), तिसगाव ३७ (आठ), दारणा ३६४७ (५१), भावली ७८७ (५५), मुकणे १८४४ (२५), वालदेवी २३८ (२१), कडवा १२५ (सात), नांदूरमध्यमेश्वर २१६ (८४), भोजापूर ५० (१४), चणकापूर ४२५ (१८), हरणबारी ६६२ (५७), केळझर ११७ (२०), नागासाक्या ७७ (१९), गिरणा ८३०१ (३६), पुनद ५९७ (४६) असा जलसाठा आहे.

गंगापूर धरण निम्मे भरले

नाशिक शहराच्या पाणी पुरवठय़ाची मुख्य भिस्त असणारे गंगापूर धरण निम्मे भरले आहे. या धरणात सध्या २७८७ दशलक्ष घनफूट अर्थात ५० टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणात केवळ ३८ टक्के पाणी होते. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १२ टक्के जलसाठा अधिक आहे. या समुहातील काश्यपी धरणात ४१६ (२२), गौतमी गोदावरी ३४६ (१९) इतका जलसाठा आहे. आळंदी धरण अद्याप कोरडे आहे. गेल्या वर्षी अखेरच्या टप्प्यात महापुराला तोंड द्यावे लागले होते. धरणे काठोकाठ भरल्याने वर्षभर पाण्याची ददाद भासली नाही. यंदा गंगापूर धरणातील साठा ५० टक्क्य़ावर आला आहे. याच महिन्यात तो आणखी उंचावल्यास जलसाठा आणि पावसाचा कालावधी यांच्याशी निगडीत वेळापत्रकानुसार धरणाचे दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे.