News Flash

इगतपुरीतील दारणाकाठच्या गावांमध्ये टँकर पाठविण्याची वेळ

तालुक्यातील धरणांनी तळ गाठल्याने तहान भागविण्यासह बागायती शेती जगवायची कशी, हा प्रश्न आहे.

इगतपुरी तालुक्यात ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणाहून पिंप भरून नेण्यात येत आहेत. (छाया-जाकीर शेख)

धरणांचा आणि पर्जन्याचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरीतील दारणा नदीपात्रालगत आणि धरणालगत असणाऱ्या अनेक गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात एकूण छोटी-मोठी ११ धरणे असतानाही पाण्यासाठी नागरिकांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या तालुक्यात आजही धरणे होत असून सर्व धरणांतील पाण्याचे नियोजन हे मुंबई, मराठवाडा, विदर्भ या विभागासाठी होत असल्याचे चित्र आहे. अवघा तालुका दुष्काळाच्या छायेत असताना तालुक्यातील मायादरा, धनोशी व चिंचलखैर या ठिकाणीच दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठय़ाच्या सात प्रस्तावांवर अद्याप निर्णय झालेला नाही. तालुक्यातील धरणांनी तळ गाठल्याने तहान भागविण्यासह बागायती शेती जगवायची कशी, हा प्रश्न आहे. यंदा वैतरणा, दारणा, कडवा या धरणांमधील पाण्यात कमालीची घट झाली आहे. तालुक्याचे वार्षकि पर्जन्यमान गतवर्षी तीन हजार मिलिमीटर असे समाधानकारक होते; परंतु पाण्याच्या साठवणुकीसाठी योग्य नियोजन नसल्यामुळे तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणे भाग पडत आहे. तालुक्यातील मुकणे, दारणा, वैतरणा, कडवा, भावली, वाकीखापरी ही मोठी, तर वाडीवऱ्हे, तळोशी, खेड, ित्रगलवाडी, शेनवड हे लघु बंधारे आहेत. लहान बंधाऱ्यांतील पाण्याचा वापर परिसरातील गावासाठी होतो. मोठय़ा धरणांचे पाणी राज्यातील इतर भागांत जाते. त्यात दारणाचे पाणी मराठवाडय़ासाठी, तर वैतरणाचे पाणी मुंबईला पिण्यासाठी आरक्षित आहे. दिवसेंदिवस पाणी प्रश्न गंभीर होत असून धरणांमधील गाळ काढल्यास धरणांची जलक्षमता वाढू शकेल. त्यामुळे जलसंपदा विभागाने धरणातील गाळ काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावापासून दोन ते तीन किलोमीटरवरील एखाद्या विहिरीवरून पाणी आणण्यासाठी ट्रॅक्टर, सायकल, बैलगाडी यांचा वापर केला जात आहे.
तालुक्यातील अनेक गावांना पावसाळा संपल्यानंतर काही महिन्यांतच टंचाईचे ग्रहण लागते. अनेक वर्षांपासून तालुक्यातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असताना टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासन आणि प्रशासन उदासीनता दाखवीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर असणाऱ्या खंबाळेजवळील डहाळेवाडीतील परिस्थिती वेगळी नाही. महिलांना पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत गावापासून दूरवर असलेल्या विहिरीवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तालुक्यातील दारणा धरण समूहातून जानेवारीतच मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने अवघ्या दोन महिन्यांतच तालुक्यातील अनेक गावांमध्ये, वाडय़ा-पाडय़ात कृत्रिम टंचाईचे संकट उभे राहिले. घोटी-सिन्नर रस्त्यावरील िपपळगाव मोर या प्रमुख गावासह पूर्व भागातील अनेक गावांमधील परिस्थिती गंभीर आहे.

इगतपुरी तालुक्यातील ज्या गावांना टंचाई जाणवत असेल त्यांनी त्वरित गटविकास अधिकाऱ्यांकडे टँकरची मागणी करावी. मागणी केलेल्या गावांना टँकर सुरू करण्यात येईल. तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी भावली धरणातील पाणी आरक्षित ठेवले आहे. वाकीखापरी धरणातही योग्य प्रमाणात पाणी आरक्षित ठेवले आहे. त्यामुळे तालुक्यात टंचाईची तीव्रता कमी आहे.
– आ. निर्मला गावित

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2016 2:45 am

Web Title: water supply by tankers in village of igatpuri
Next Stories
1 उन्हाळ कांद्याचा उत्पादन खर्च निघणेही अवघड
2 पर्यावरणीय अहवालाद्वारे १६ गावांमध्ये स्थानिक समस्या सोडविण्याकडे लक्ष
3 शासकीय योजनांविषयी कार्यशाळेद्वारे राजकीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
Just Now!
X