News Flash

शहरात पाण्याचा मनसोक्त आणि अनिर्बंध वापर

शहराला गंगापूर, दारणा आणि नव्याने समाविष्ट झालेले मुकणे या तीन धरणांमधून पाणीपुरवठा होतो.

ना पाणी कपात ना काटकसर, शेती पाण्यापासून वंचित

अनिकेत साठे, नाशिक

महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने प्रति दिन, प्रति माणशी १३५ लिटर पाणी वापर निश्चित केलेले आहे. पाणीटंचाईमुळे या निकषानुसार पाणी देणे सर्वत्र अवघड झाले असताना नाशिकमध्ये मात्र त्याच्या दुप्पट म्हणजे प्रति माणशी २२५ ते २५० लिटर पाण्याचा वापर होत आहे. शहरात पाण्याबाबत काटकसरीचे धोरण अवलंबले असते तर उन्हाळ्यात शेतीलाही पाणी पुरविता आले असते. तथापि, हे दातृत्व महापालिका दाखवू शकली नाही. परिणामी, पाण्याच्या मनसोक्त वापराची शहरवासीयांना जडलेली सवयही कायम राखण्यास महापालिकेचाही हातभार लागला आहे.

मनमाडमध्ये २५ दिवसांआड तर येवला, सिन्नरसारख्या अनेक निमशहरी भागांत आठवडा-पंधरवडय़ातून एकदाच नळाला पाणी येते. म्हणजे इतक्या दिवसांचे पाणी साठवून तेथील नागरिकांना काळजीपूर्वक वापरावे लागत आहे. यंदा ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून पाण्यासाठी एक-दोन किलोमीटरची पायपीट नित्याची बनली आहे. माणसांसह जनावरे पाण्यासाठी तडफडत असून बारमाही पिके वाचविणे जिकिरीचे ठरले आहे.

मात्र दुष्काळाची कोणतीही झळ नाशिक शहरास बसलेली नाही. शहरात ना पाणी कपात ना काटकसरीने वापराची तजवीज, अशी परिस्थिती आहे.

महापालिका क्षेत्रात काही इमारती, बंगल्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा अनिर्बंधपणे वापर केला जात असून हे पाणी गाडी धुण्यापासून ते झाडे जगविण्यापर्यंत सर्व कारणांसाठी वापरले जात आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात महापालिकेने कारवाई करण्याचा इशारा दिला होता, मात्र प्रत्यक्षात काय कारवाई झाली, ते गुलदस्त्यातच आहे.

शहराला गंगापूर, दारणा आणि नव्याने समाविष्ट झालेले मुकणे या तीन धरणांमधून पाणीपुरवठा होतो. त्यातही एकूण गरजेपैकी ९० टक्के पाणी महापालिका एकटय़ा गंगापूरमधून उचलते. सुमारे १८ लाखांहून अधिक लोकसंख्येला पाणी पुरविण्याकरिता महापालिका धरणांमधून दररोज १६ दशलक्ष घनफूट पाणी उचलते. मुबलक पाणी असल्याने पालिकेने कपातीचा विचारही केलेला नाही. शहरात १८०० किलोमीटर जल वाहिन्यांमधून घरोघरी पाणी वितरित होत असून अवाढव्य वितरण प्रणालीतील पाणी गळती हीदेखील चिंतेची बाब आहे. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निकषानुसार पाणीपुरवठा झाला असता तरी दैनंदिन पाणीपुरवठय़ात मोठी बचत करता आली असती आणि बचत केलेले हे पाणी इतरत्र पिण्यासह शेतीला देता आले असते. पण तसा विचार झाला नाही.

पाणी आरक्षित करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य असते. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने महापालिकेसाठी पाणी आरक्षित झाले आहे. शहरात पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन वारंवार केले जाते. शहराची गरज लक्षात घेऊन दररोज गरजेएवढे पाणी धरणातून उचलले जाते. आरक्षित पाण्याचा वापर वा तत्सम बाबींवर टिप्पणी करण्याचा पाटबंधारे विभागाला कोणताही अधिकार नाही. शेतीसाठी आवर्तन देतानाचे नियोजन त्यांच्या अखत्यारीत आहे. लाभक्षेत्रात कोणत्या पिकांसाठी किती पाणी द्यायचे याचे निकष असतात. पाटबंधारे विभागाने त्यानुसार त्यांचे नियोजन करण्याची गरज आहे.

– पाणीपुरवठा विभाग (महापालिका)

 

बारमाही पिके कशी वाचणार?

नाशिक, निफाड तालुक्यासह आसपासच्या भागात सिंचनासाठी गंगापूर धरणात समाधानकारक जलसाठा असल्यास रब्बीसाठी दोन आणि उन्हाळ्यात दोन आवर्तने दिली जातात. यंदाच्या दुष्काळी वर्षांत केवळ रब्बीसाठी दोन आवर्तने देणे शक्य झाले. उन्हाळ्यात पिकांसाठी आवर्तन देता आले नाही. महापालिकेने पाण्याचा काटकसरीने वापर केला असता तर उन्हाळ्यात शेतीसाठी एखादे आवर्तन देता आले असते. परंतु तसा विचार न झाल्यामुळे बारमाही पिके, द्राक्ष बागा अडचणीत सापडल्याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष वेधले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 1:06 am

Web Title: water supply in nashik enough water supply in nashik city
Next Stories
1 नाशिकसाठी मतमोजणीच्या २७, तर दिंडोरीसाठी २५ फेऱ्या
2 जे सोपे तेच काम पोलीस करतात
3 आवर्तनात एक हजार दशलक्ष घनफूट पाणी वाया जाणार
Just Now!
X