17 November 2019

News Flash

शहरातील पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ; पाणी कपातीत वाढ

शहर परिसरात पाऊस कोसळत असला तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शहरात लागू झालेल्या पाणी कपातीत वाढ करण्यात आली आहे. आता दर गुरुवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गेल्या रविवारपासून शहरात दोनऐवजी एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊसमान पाहून सप्ताहातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवायचा की नाही याचा निर्णय घेतला जाणार होता. पावसाअभावी त्याची अंमलबजावणी करावी लागली आहे.

दुष्काळी वर्षांत पालिकेने काटकसरीचे धोरण अवलंबिले नव्हते. शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण तळ गाठण्याच्या मार्गावर असल्याने पुढील काळात त्यातून पाणी उचलण्यास अडचणी येतील, हे लक्षात घेऊन अखेरच्या टप्प्यात कपातीचा विचार झाला. त्यानुसार ज्या भागात दोन वेळा पाणीपुरवठा होतो, तिथे एकदाच, तर ज्या भागात एक वेळ पाणीपुरवठा होतो, तेथील पाणीपुरवठय़ात काहीअंशी कपात सुचविली. तसेच आठवडय़ातून एकदा कोरडा दिवस अर्थात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा मुद्दा मांडला होता.

प्रशासनाचा पहिला पर्याय आधी स्वीकारला गेला. त्यानुसार ज्या भागात दोन वेळा पाणीपुरवठा होतो, त्या भागात एक वेळ पाणीपुरवठा होत आहे. एक वेळ पाणीपुरवठा होणारे काही भाग असून तेथील पाणीपुरवठय़ात काहीअंशी कपात झाली.

शहर परिसरात पाऊस कोसळत असला तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. या पाश्र्वभूमीवर, पाणी वापराचे फेरनियोजन करण्यात आले. आठवडय़ातील एक दिवस म्हणजे गुरुवार हा कोरडा दिवस पाळण्याचे निश्चित करण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी ४ जुलैपासून होत असल्याची माहिती महापालिकेने दिली. दरम्यान, पालिका कपातीचे प्रमाण वाढवीत असले तरी पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर काय कारवाई करते, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. वाहन धुणे, बांधकामासाठी वापर, अंगणात सडा टाकणे, बांधकामासाठी विनापरवाना सर्रास पाण्याचा वापर होतो. अनेक भागांत घरगुती जोडणीत विद्युत मोटारीचा वापर करून पाणी खेचले जाते.

संबंधितांवर कारवाईचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना दिले गेले आहेत. तथापि, टंचाईच्या काळात प्रभावीपणे कारवाई होत नसल्याचा सूर उमटत आहे.

First Published on July 3, 2019 4:21 am

Web Title: water supply in the nashik city closed every thursday zws 70