कोसळण्याच्या अवस्थेत; उपाययोजना नाही

सटाणा शहराला जवळपास ४१ वर्षांपासून पाणीपुरवठा करणारा जलकुंभ धोकादायक झाला आहे. तो केव्हाही कोसळण्याची भीती संरचना परीक्षण अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. वर्षभरापासून अहवाल प्राप्त होऊनही भर रस्त्यावर असलेल्या या धोकादायक जलकुंभाबाबत कोणत्याही उपाययोजना न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सटाणा शहरातील पालिकेच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या भागांतील चार जलकुंभांचे संररचना परीक्षण करण्यात आले. त्याबाबत प्राप्त झालेल्या अहवालात ताहाराबाद रस्त्यावरील पंडित धर्माजी पाटील जलकुंभ गळका आणि पडका झाल्याचे स्पष्ट केले आहे. जलकुंभाच्या आजूबाजूला असलेले व्यापारी, शालेय प्रशासनाने वेळोवेळी जलकुंभ दुरुस्त करण्याची मागणी केली होती. त्याकडे दुर्लक्ष केल्याने संरचना अहवाल माहितीच्या अधिकार कायद्यान्वये मिळवण्यात आला. त्यात ही धक्कादायक माहिती उघड झाली. सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १९७६ मध्ये आरसीसी बांधकाम असलेला सुमारे सात लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला. तांत्रिकदृष्टय़ा त्याचे दर १५ वर्षांनी संरचना परीक्षण करून आवश्यकतेनुसार दुरुस्ती करून घेणे आवश्यक असते, परंतु पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती न झाल्यामुळे हा जलकुंभ गळका आणि पडका झाला आहे.

अहवालातील माहिती

पंडित धर्माजी पाटील जलकुंभाचा संरचना परीक्षण अहवाल १४ जून २०१७ रोजी पालिका प्रशासनाला प्राप्त झाला. त्यात जलकुंभाच्या नऊ स्तंभांपैकी दोन स्तंभांचे काँक्रीट निघाले असून आतील गज गंजलेल्या अवस्थेत आहेत. जलकुंभाच्या भिंतींना तडे गेल्याने गळती सुरू आहे, जलकुंभाचे तळाचे छत, पायऱ्या यांचे लोखंडी गज खराब झाले आहेत. एकंदरीत अहवालात हा जलकुंभ पूर्ण क्षमतेनुसार कार्यरत नसून तो भविष्यात केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या अभियंत्यांनी हा अहवाल दिला आहे.