08 March 2021

News Flash

कमी खर्चात लग्न उरकण्याची ग्रामीण भागात घाई

करोनाविरुद्धचे नियम वधू पित्याच्या पथ्यावर

करोनाविरुद्धचे नियम वधू पित्याच्या पथ्यावर

नाशिक  : करोना संसर्गवाढ रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या नियमांमुळे अनेकांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असले तरी हेच नियम वधू पित्याच्या पथ्यावर पडले आहेत. विवाह सोहळ्यातील उपस्थितीवर र्निबध असल्याने खर्चात बचत होत आहे. त्यामुळे याचा लाभ उठविण्यासाठी ग्रामीण भागात करोना संकट काळात विवाह सोहळ्यांचे प्रमाण वाढले आहे.

मार्च महिन्यात करोनाचा संसर्ग फैलावण्यास सुरुवात झाली. वेगवेगळ्या क्षेत्रांवर याचा परिणाम होत असताना शिक्षण क्षेत्रही त्यास अपवाद ठरले नाही.  अभिव्यक्ती संस्थेच्या वतीने जिल्ह्य़ात पेठ, हरसूल, सुरगाणा, त्र्यंबक या आदिवासी भागात सर्वेक्षण करण्यात आले. शाळा, महाविद्यालय बंद असल्याने मुलींना घरातील अतिरिक्त कामे करावी लागत आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने शेतीच्या कामाची त्यात भर पडली आहे. याशिवाय घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना सांभाळण्याचे कामही त्यांना करावे लागत आहे. संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात केवळ २० टक्के ग्रामीण मुलींकडे अद्ययावत भ्रमणध्वनी आहे. त्यातही मोजक्याच विद्यार्थिनींकडे असा भ्रमणध्वनी आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू राहिल्यास औपचारिक शिक्षणातून गळती होईल. हाताला काम नसल्याने लग्नाला होकार देण्याशिवाय

पर्याय नसल्याचे मुलींचे म्हणणे असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत मुलींना शिक्षण आणि नोकरी या दोन्ही गोष्टी ग्रामीण भागात सोप्या नसल्याने लग्नाशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे विवाह सोहळ्यात ५० लोकांपेक्षा अधिक जणांची उपस्थिती नको, असे र्निबध असल्याने विवाहात होणाऱ्या खर्चात बचत होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रातोरात मुलींची लग्ने होऊ लागली आहेत. कोचरगाव येथील मनीषा गांगोडे यांनी मुलीचे लग्न झाले म्हणजे आपल्या डोक्यावरचा भार कमी झाला अशी पालकांची समजूत असल्याचे सांगितले. शिक्षण किंवा नोकरीच्या नावाखाली मुलीने प्रेमात पडून पळून जाऊ नये यासाठी पालक मुलीचे कमी वयात लग्न करून देत आहेत.  शाळा, महाविद्यालय बंद असल्याने तसेच सध्या नोकरीवरून कमी के ल्याने घरी असलेल्या मुलींवर लग्नासाठी भावनिक दबाव  टाकण्यात येत आहे. विशेष म्हणजे इतर वेळी लग्न जमविण्यापासून ते पार पडेपर्यंत दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जात असताना सध्या अवघ्या दोन दिवसांत मळ्यामध्ये कमी खर्चात, मानपानाला फाटा देत विवाह होऊ लागले असल्याचे मनीषाने सांगितले.

सध्या टाळेबंदी असतानाही विवाहांचे प्रमाण वाढले आहे. ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही; त्या कुटुंबांतील मुलींचे विवाह सध्या उरकण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी खर्चात म्हणजे अवघ्या १५ ते २० हजारांत लग्न होत आहे. त्यामुळे पालक लग्नासाठी घाई करत आहेत. परंतु, आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असलेले दिवाळीपर्यंत लग्न करण्यासाठी थांबले आहेत.

– झुंबर ताठे (त्र्यंबकेश्वर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 12:06 am

Web Title: wedding ceremonies increased during the corona crisis in rural areas zws 70
Next Stories
1 लाच स्वीकारणाऱ्या महिला सरपंचाला अटक
2 नाशिकच्या कलाकारांची वेबमालिका ‘टिक टॅक टो’
3 आजपासून दुकाने, मद्यालये, हॉटेल सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत खुली
Just Now!
X