कार्यालयात प्रवेशाआधी तापमापनाचे बंधन; जिल्ह्यातील निर्बंध पूर्वीप्रमाणेच

नाशिक : गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढली असून त्यास लग्नसोहळे हेच मुख्य कारण ठरल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत करोनाची आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीनंतर  पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ बोलत होते.

राजापूर येथील लग्नास गेलेले पाच जण बाधित झाले. तर चांदवड येथे लग्न सोहळ्यातील १७ व्यक्तींना करोनाची लागण झाली. त्यामुळे विवाह सोहळ्यास परवानगी देतानाच कार्यालयात प्रवेश देतांना तापमापन करणे, सॅनिटायझर, मुखपट्टीचे बंधन टाकण्याचे निर्देश दिले. अशा कार्यक्रमांस ५० पेक्षा अधिक गर्दी व्हायला नको असे आदेश त्यांनी  पोलीस यंत्रणेला दिले.

दुसऱ्या लाटेत ४८ हजारापर्यंत वाढलेली सक्रिय रुग्णांची संख्या आता १७८७ वर आली असली तरी निर्बंध पूर्वीप्रमाणे कायम राहतील. मागील काही आठवडे रुग्णसंख्या अडीच हजारावर स्थिरावली होती. ती कमी होत असली तरी सिन्नर, नाशिक ग्रामीण, निफाडसह काही भागात वाढ होत आहे. त्यास विवाह सोहळा, गर्दी, मुखपट्टीचा वापर टाळणे ही कारणे आहेत. तुलनेत नाशिक शहरात रुग्णसंख्या कमी होत आहे.

अ‍ॅम्फाटेरेसीन बी.इंजेक्शनचा आजही तुटवडा

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एकूण ७०४ रुग्ण आढळले. त्यातील ४३५ जणांवर मोठय़ा शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यात डोळे, जबडा, हिरडय़ा, दात आदींचा समावेश आहे. या आजाराने आतापर्यंत ७० रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर १० टक्के आहे. आजही अ‍ॅम्फाटेरसीन बी इंजेक्शनचा तुटवडा आहे. जिल्ह्याची गरज ४० हजार इंजेक्शनची आहे. आतापर्यंत १५ हजार इंजेक्शनचा पुरवटा झाला आहे. इंजेक्शन पुरवठा आवश्यकेनुसार झाल्यास रुग्णांवरील शस्त्रक्रियेची वेळ येणार नाही. मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल, असे भुजबळ यांनी नमूद केले.

राजकीय आंदोलनांना मुभा

आरक्षणाच्या बाबत अन्याय होत असल्याच्या भावनेतून आंदोलनाद्वारे आवाज उठविला जातो. त्यांना थांबवता येणार नाही. शेतकऱ्यांच्या विविध अडचणी आहेत. त्यांना कसे थांबविता येईल, असे प्रश्न करीत भुजबळ यांनी आंदोलनकर्त्यांनी करोनाच्या नियमांचे पालन करून आंदोलन करण्याची सूचना केली. आंदोलकांनी अधिक वेळ आंदोलन चालवू नये. आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधले जाईल इतपत ते नियंत्रित ठेवावे. आंदोलनात मुखपट्टीचा व करोना नियमांचा वापर करावा. आवश्यक ती काळजी घेऊन आंदोलन करावे, असे आवाहन  त्यांनी केले.