अस्थी विसर्जनासाठी येणाऱ्या देशभरातील भाविकांना बसत असून गोदावरी प्रवाही नसल्याने रामकुंडात साचलेल्या दरुगधीयुक्त पाण्यात त्यांना हे सोपस्कार पार पाडावे लागत असल्याचे चित्र आहे. पुढील तीन ते चार महिने ही स्थिती राहणार असल्याने महापालिकेने आसपासच्या भागातून पाणी रामकुंडात आणता येईल का, याची चाचपणी सुरू केली आहे. तथापि, पुरोहितांना विश्वासात न घेता अशी काही कृती झाल्यास ती भाविकांची फसवणूक ठरेल, असा इशारा गंगा गोदावरी पुरोहित संघाने दिला आहे. सिमेंट काँक्रीटीकरणाद्वारे पात्रातील नैसर्गिक स्रोत बंद केले गेले. रामकुंडातील पाण्याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी पालिका तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या प्रयत्नात असल्याची तक्रार गोदावरी नागरी सेवा समितीने केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील प्रमुख पर्वण्यांवेळी भरभरून वाहणारे गोदापात्र आता जवळपास कोरडेठाक झाले आहे. सिंहस्थात सोडलेल्या पाण्यामुळे उच्च न्यायालयाने ताशेरे मारून पुन्हा पाणी सोडण्यास प्रतिबंध केला आहे. त्यातच, गंगापूर धरणामधून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यामुळे यंदा शेतीसह नाशिकमध्ये पाणीकपात करावी लागली. त्याचा फटका रामकुंडावर अस्थी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना सहन करावा लागत आहे. कुंडात अस्थी विसर्जनासाठी रोज शेकडो भाविक येत असतात. विधीवत पूजन करून ही प्रक्रिया पार पाडली जाते. मात्र, रामकुंडासह गोदावरीच्या सध्याच्या स्थितीमुळे परिसरात कमालीची दरुगधी आहे. या ठिकाणी काही काळ उभे राहणे अवघड ठरते. या स्थितीत पूजन व अस्थी विसर्जन करणे जिकिरीचे ठरत असल्याची भाविकांची प्रतिक्रिया आहे. रामकुंडाच्या समोरील बाजूला कपालेश्वर मंदिराच्या लगत देवांग जानी यांच्या निवासस्थानी उमातीर्थ अर्थात जिवंत पाण्याचा स्रोत असणारी विहीर आहे. साधारणत: ८०० ते हजार मीटरवर असणाऱ्या या स्रोताचे पाणी रामकुंडात आणता येईल काय, असा विचार पालिका करत आहे. त्या अनुषंगाने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जानी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. पण, कागदोपत्री अद्याप तसा कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही. वास्तविक रामकुंडालगतच्या इंद्रकुंडात पाण्याचे स्रोत आहेत. काँक्रीटीकरणात हे स्रोत बुजविले गेले. ते पुनस्र्थापित करून रामकुंडात कायमस्वरूपी पाणी आणणे शक्य आहे.