सुब्रह्मण्यम स्वामी यांची मागणी; नाशिकमधील कार्यक्रमात गांधी कुटुंबावर टीका
माल्दाच्या घटनेत पश्चिम बंगाल सरकार राज्य घटनेच्या विरुद्ध काम करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करावे असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. भारतात वास्तव्य करणे पत्नीला सुरक्षित वाटत नसल्याचे विधान अमिर खानने काही दिवसांपूर्वी केले होते. त्याचा समाचार घेताना पती-पत्नीमधील चर्चा अशा पद्धतीने चव्हाटय़ावर आणणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
येथील सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर रविवारी परशुराम साईखेडकर नाटय़गृहात डॉ. स्वामी यांचे ‘भारत- काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना गांधी कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले. ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना कारागृहात जावे लागेल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या वर्षांत अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका असल्याने तो मुद्दा पुढे केला जात असल्याचा आरोप करणारे मंदिरविरोधी आहेत. अयोध्येत मशिदीसाठी शरयूच्या पलीकडच्या तिरावर जागा देण्याची हिंदुत्ववादी संघटनांची तयारी आहे.
पाकशी चर्चा योग्य
राम मंदिर उभारणीचे काम सुरू झाल्यावर जम्मू-काश्मीरमधील ३७० वे कलम रद्द करण्याच्या मुद्दय़ाला प्राधान्य दिले जाईल. पठाणकोटमधील हल्ल्यानंतर पाकिस्तानशी चर्चा करण्याचे मोदी सरकारचे धोरण योग्य आहे; परंतु संरक्षणमंत्रिपदाची धुरा आपल्याकडे असती तर आपण पंतप्रधानांना पाकिस्तानमधील धोकादायक स्थितीची जाणीव करून दिली असती. दहशतवाद्यांच्या हाती पाकिस्तानातील आण्विक अस्त्रे गेल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे भारताने लष्करी कारवाईद्वारे पाकिस्तानचे विभाजन करावे, असा सल्लाही दिला.
पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर विविध मुद्दय़ांवरून शरसंधान साधणाऱ्या स्वामी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची मात्र प्रशंसा केली. राजीव गांधी हे राष्ट्रवादी विचारांचे होते. त्यांचा मृत्यू झाला नसता तर आज काँग्रेसची इतकी दुर्दशा झाली नसती.
हिंदू संस्कृतीने सर्वाना सामावून घेतले आहे. भारतात त्यामुळे लोकशाही टिकून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्वामी यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न
सुब्रह्मण्यम स्वामी यांची काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध असलेली भूमिका लक्षात घेत नाशिक येथील कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अडथळा येण्याची शक्यता लक्षात घेत कार्यक्रम स्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्याख्यानातही स्वामी यांनी पंडित नेहरूंसह सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. व्याख्यान संपल्यानंतर स्वामी यांचे वाहन महात्मा गांधी रस्त्यावरून जात असताना काँग्रेस कार्यालयाजवळ काही कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वामी यांची गाडी पुढे गेली.