18 July 2019

News Flash

दहावीची परीक्षा सुरू असतानाच अकरावी प्रवेशाची पूर्वतयारी

दहावीची परीक्षा मध्यावर असतानाच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेविषयी राज्य स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत काही बदल

दहावीची परीक्षा मध्यावर असतानाच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेविषयी राज्य स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. ऑनलाइन प्रवेश घेताना होणारा गोंधळ लक्षात घेता प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता यावी यासाठी नव्या शैक्षणिक वर्षांत कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या सर्व केंद्रावर ही पद्धत अवलंबिण्यात येत आहे. कामात सुसूत्रता रहावी या अनुषंगाने उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झालेली महाविद्यालयांच्या प्रपत्रामधील माहिती (शाखानिहाय तुकडय़ा, अनुदानित, विना-अनुदानित, कायम विना अनुदानित)  तपासून शिक्षण संचालक (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) यांनी निश्चित केलेल्या ऑनलाइन सेवा पुरवठादारास वेळेत ही माहिती दिली जाईल. विद्यार्थ्यांला एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, विज्ञान, वाणिज्य शाखांपैकी केवळ एकाच शाखेची मागणी करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार प्रवेश अर्जातील भाग दोन मधील शाखा बदल पसंती क्रम बदलण्याची संधी देण्यात येईल. अर्ज भरतांना महापालिका क्षेत्रातील किमान एक ते १० कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम देणे बंधनकारक राहील. उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वीच्या एचएसव्हीसी अभ्यासक्रमाचे प्रवेशही ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.

दहावीचा ऑनलाइन निकाल लागल्यावर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवडय़ात सुरू करण्यात येईल. त्यासाठी शून्य फेरीत सर्व उच्च माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी व्यवस्थापन अंतर्गत तसेच अल्पसंख्याक कोटय़ातील विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमानुसार करावे, यानंतर तीन नियमित फेऱ्या होतील. या फेऱ्यांमध्ये संवर्गनिहाय, गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमानुसार प्रवेशासाठी वर्गीकरण करण्यात येईल. नियमित फेरीचा कालावधी एक आठवडय़ाचा राहील. तीन फेऱ्या झाल्यानंतर विशेष फेरी होईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर प्रवेश प्रक्रिया सुरू राहील.

दरम्यान, आरक्षणसंदर्भातील सर्व तरतुदी संपूर्ण राज्यातील ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी लागू राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून ऑनलाइन प्रणाली, नियंत्रण करणारी संस्था, प्रवेश नियंत्रण कक्षासाठी लागणारा खर्च, विद्यार्थ्यांकरीता शाळांमध्ये मदत, मार्गदर्शन केंद्र तयार करून जेथे त्यांना अर्ज भरण्यात अडचणी येतील तेथे त्यांना मदत करण्याची व्यवस्था करून देण्यात यावी आदी सूचना करण्यात आल्या आहेत.

आयटीआय, अभियांत्रिकी प्रवेशार्थीना ११ वी प्रवेशाची संधी

आयटीआय, अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी खबरदारीचा उपाय म्हणून ११ वी प्रवेशाकरिता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज भरतात. हा प्रवेश रद्द करत त्यांना आयटीआय, अभियांत्रिकीची निवड करावी लागते. मात्र हे विद्यार्थी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा येत राहतात. अशा विद्यार्थ्यांकरीता अर्ज मागे घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आयटीआय किंवा तत्सम शाखेतच प्रवेश घेतला आहे आणि ११ वी प्रवेश प्रक्रियेत यायचे नाही, त्यांना हा अर्ज मागे घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल आणि फक्त ज्यांना ११ वीमध्ये प्रवेश हवा त्यांची माहिती समोर येईल.

First Published on March 9, 2019 1:15 am

Web Title: while the class x examination was underway the preparatory work for the 11th entrance