29 November 2020

News Flash

घाऊक कांदा बाजारातील व्यवहार ठप्प

साठवणूक निर्बंधांमुळे दैनंदिन व्यवहारात अनेक अडचणी

(संग्रहित छायाचित्र)

अनिकेत साठे

कांद्याचे दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांवर साठवणूक मर्यादा घातल्याच्या निषेधार्थ सोमवारी व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. साठवणुकीच्या निर्बंधांमुळे व्यापारी कमी प्रमाणात माल खरेदी करतील. उर्वरित कांद्याला खरेदीदार देखील मिळणार नाही. विक्रीस आणलेला माल परत न्यावा लागेल. यामुळे भाव घसरतील, या चिंतेमुळे शेतकऱ्यांनी बंदला पाठिंबा दिल्याचे चित्र आहे. घाऊक व्यवहार तातडीने सुरळीत न झाल्यास शहरी भागात कांदा तुटवडय़ाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

राज्यातील उपाहारगृहे सुरू झाल्यानंतर मागणीत वाढ झाल्यामुळे गेल्या आठवडय़ात प्रारंभी सात हजारांचा टप्पा ओलांडणारा कांदा केंद्र सरकारच्या साठवणूक मर्यादेच्या निर्णयानंतर सुमारे दीड हजाराने घसरला. बाजार बंद होण्याच्या दिवशी लासलगाव बाजारात ५८०० रुपये क्विंटल भाव मिळाला होता. किरकोळ व्यापारी दोन तर घाऊक व्यापारी २५ टन कांद्याची साठवणूक करू शकतात. ३१ डिसेंबपर्यंत साठवणुकीची ही मर्यादा कायम राहणार आहे. कांदा दरवाढ रोखण्यासाठी मागील वर्षी केंद्राने जे काही उपाय केले होते, त्याची पुनरावृत्ती यंदाही होत आहे.

साठवणूक मर्यादा लागू करण्याआधी प्राप्तिकर विभागाने मोठय़ा व्यापाऱ्यांवर छापे टाकले होते. त्यांचे व्यवहार, कांदा साठा, विक्री याची पडताळणी केली गेली. कर चोरीच्या संशयावरून ही कारवाई झाली. प्राप्तिकरने व्यापाऱ्यांच्या कांद्याची अगदी चाळीत जाऊन माहिती घेतली. महानगरांमध्ये कांदा महागला की, निर्यातबंदी, प्राप्तिकरचे छापे, साठवणूक मर्यादा, आयातीला परवानगी ही मालिका सुरू होते. मात्र, अशी धडपड करूनही गतवर्षी कांद्याने १० हजाराचा टप्पा गाठल्याचा ताजा इतिहास आहे. महिनाभरापूर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून मुक्त केलेला कांदा पुन्हा निर्बंधाच्या जोखडात बांधला गेला. या विरोधात व्यापाऱ्यांनी लिलावातून अंग काढून घेतले. काही शेतकरी संघटनांनी त्यास पाठिंबा दिला. यामुळे बाजार समितीतील कांदा व्यवहार पूर्णत: थंडावले आहेत.

निर्णय जाचक

लासलगाव, पिंपळगावसह अन्य बाजार समित्यांमध्ये उत्पादकांनी कांदा विक्रीला आणला नाही. दुसरीकडे व्यापाऱ्यांनी लिलाव बंद करीत असल्याचे अधिकृत पत्र दिले नाही. त्यास लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दुजोरा दिला. साठवणूक निर्बंध दैनंदिन व्यवहारासाठी जाचक ठरणार आहेत. लासलगाव बाजार समितीत महिनाभरात आवक निम्म्याने कमी झाली आहे. उत्पादक बाजारात माल आणतात. तो किती प्रमाणात येईल, याचा अंदाज नसतो. सध्या सात हजार क्विंटलची आवक होत आहे. साठवणुकीला निर्बंध असल्याने व्यापारी सर्व मालाची खरेदी करू शकणार नाही. शिल्लक राहिलेला माल उत्पादकांना परत न्यावा लागेल. या स्थितीमुळे भाव आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे जगताप सांगतात. घाऊक बाजारात मोकळ्या स्वरूपात कांद्याची विक्री होते. व्यापारी खरेदीनंतर गोण्यांमध्ये भरणे वा तत्सम कामे करतात. त्यासाठी तीन-चार दिवस लागतात. या काळात साठय़ाची मर्यादा कशी पाळली जाईल हा आणखी एक प्रश्न आहे. घाऊक बाजारात कांदा व्यवहार सुरू न झाल्यास देशभरात कांदा तुटवडय़ाला तोंड द्यावे लागू शकते. व्यापाऱ्यांच्या लिलाव बंदला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. सणासुदीच्या काळात आणि रब्बीच्या हंगामासाठी उत्पादकांना आर्थिक तरतुदीची गरज असल्याने बाजार समित्यांचे कामकाज तात्काळ सुरू करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली. म्हणजे शेतकरी संघटनांमध्ये याविषयी एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे.

२५ मेट्रिक टन या साठवणुकीच्या निर्बंधात काम कसे करायचे, हा व्यापाऱ्यांसमोरील प्रश्न आहे. बाजार समित्यांमध्ये किती माल येईल याचा अंदाज नसतो. साठवणूक मर्यादेमुळे माल खरेदी कमी होईल. तसेच अनेक अडचणी भेडसावणार असल्याने व्यापारी वर्गात संभ्रम आहे. लिलाव बंद असल्याने कांद्याचा तुटवडा वा काहीही होऊ शकते. एखाद्या स्थानिक व्यापाऱ्याने दिल्लीत माल पाठविला आणि तेथील खरेदीदाराकडे आधीचा माल शिल्लक असल्यास साठवणूक मर्यादेच्या निर्बंधामुळे तो आमचा माल कसा उतरवून घेईल? बाजार समितीत येणाऱ्या मालाची खरेदी करून तो देशभरातील बाजारात पाठविण्याची व्यापाऱ्यांची एक साखळी आहे. निर्बंधामुळे ती साखळी अडचणीत आली आहे.

– नंदकुमार डागा ,उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:16 am

Web Title: wholesale onion market stagnates abn 97
Next Stories
1 कांदा भावात चढ-उतार कायम
2 शहर बससेवेस पहिल्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद
3 ‘निमा’ वाद : तीनही पक्षकार घटनेनुसार काम करत नसल्याचे धर्मादाय उपायुक्तांचे निरीक्षण