सटाणा तालुक्यात मद्यपी शेतकऱ्याचा खून करत आत्महत्या केल्याचा बनाव रचल्या प्रकरणी पत्नी व मुलास जायखेडा पोलिसांनी अटक केली. संशयितांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सटाणा तालुक्यातील बिझोटे शिवारात रवींद्र नानाभाऊ जाधव (४१) हे आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास होते. मंगळवारी रात्री उशिराने राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची छाननी केली असता जाधव यांचा खून करून आत्महत्येचा बनाव रचला गेल्याचे उघडकीस आले. पत्नी मीराबाई व मुलगा योगेश यांची चौकशी केली असता जाधव यांचा खून झाला असल्याचा प्रकार उघडकीस आला. जाधव यांना दारूचे व्यसन असल्याने सतत घरात भांडण होत असे. यातून पत्नी मीरा यांना मारहाण नित्याची होती. या सगळ्याचा शेवट करण्यासाठी पत्नी मीरा व मुलगा योगेश यांनी त्यांना मारण्याचा बेत आखला. मंगळवारी रात्री उशिराने विहिरीजवळील परिसरात त्यांनी जाधव यांना मारहाण करत गळा दाबून खून केला. या प्रकरणी पत्नी व मुलगा यांना अटक करण्यात आली