चारुशीला कुलकर्णी

वन्यजीव संरक्षण कायद्याचेही उल्लंघन

कासव घरात ठेवले तर शुभ असते, मांडूळ जातीच्या सापामुळे गुप्तधन मिळवता येते, मगर, बिबटय़ा, माकड किंवा अन्य प्राण्यांच्या अवयवाने दुर्धर आजार बरे होतात. एखाद्या प्राण्याच्या मदतीने काळी जादू करता येते, अशा अनेक भ्रामक कल्पना आणि अंधश्रद्धा वन्यजीवांच्या जिवावर बेतत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आदिवासीबहुल पट्टय़ातील तस्करीचे धागेदोरे आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले असल्याचे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी धडपडणाऱ्या संस्थांचे निरीक्षण आहे. महत्त्वाची बाब म्हणजे झटपट पैसे कमविण्याच्या नादात या तस्करीत युवा वर्गाचा सहभाग चिंताजनक आहे. दुसरीकडे आपण घरात शुभदायी म्हणून जे प्राणी बाळगतो, त्यातून वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन होते, तो गुन्हा ठरतो याचेही भान अनेकांना राहिलेले नाही.

शहरात मगरीची आठ पिल्ले आणि दोन कासव जप्त करून तस्करीचे जाळे शहर पोलिसांनी ठाणे येथील वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या मदतीने उद्ध्वस्त केले. या कारवाईतून वन्यप्राण्यांच्या तस्करीवर पुन्हा प्रकाश पडला आहे. शहरात धकाधकीच्या जीवनात विरंगुळ्यासाठी अनेकांनी पाळीव प्राणी सांभाळण्यास सुरूवात केली आहे. कुत्रा, मांजर यांच्या विविध प्रजातींचे पालन होत असतांना काहींनी ‘लव्ह बर्ड’ सह अन्य पक्ष्यांच्या संगोपनाला प्राधान्य दिले. या प्राधान्य क्रमाच्या यादीत घुबड, कासव, माकड यांसारख्या वन्यजीवांचा शिरकाव कसा झाला हे समजलेच नाही.

दिवाणखाना किंवा घराची शोभा वाढविण्याच्या पलीकडे जाऊन काहींनी गुप्त धनाच्या लालसेतून, तर कधी काळी जादू, अघोरी विद्या शिकण्यासाठी वन्यजीव पालन करण्यास सुरुवात केली. यामुळे काही वर्षांत कासव, नाग, मांडूळ, पोपट, घुबड या वन्यजीवांच्या तस्करीचे अनेक प्रकार उघडकीस आले असल्याचे वन्यजीव अभ्यासक तसेच वाइल्ड लाइफ असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य पाटील यांनी सांगितले. वन्यजीवांच्या तस्करीमागे अंधश्रद्धा आणि काही तरी वेगळे करण्याची वृत्ती कारणीभूत आहे. पाळीव पक्ष्यांचा कंटाळा आल्याने आता काही जण घुबड, मुंगूस, कोब्रा असे प्राणी, पक्ष्यांचे संगोपन करत आहे. दुसरीकडे, अंधश्रद्धेतून फेंगशुई तत्त्वानुसार कासव, तर धनाचा शोध घेण्यासाठी मांडूळ असे काही प्रकार घडत आहेत.

आदिवासी लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांना या प्रकारात ओढले जाते, तर काही ठिकाणी युवक अल्पावधीत जास्त पैसे मिळतात म्हणून हा धोका पत्करत असल्याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.

आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा

राज्य तसेच देशातील आदिवासी विशेषत जंगल परिसरातून मांडूळ, घुबड, नाग यांची लोकांच्या मागणीप्रमाणे तस्करी होत आहे. यासाठी स्थानिक पातळीवर एखादीव्यक्ती आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांना अल्प मोबदल्यात हे वन्य जीव मिळविण्यासाठी राबवून घेते. प्राणिमित्र नावाखाली या प्राण्यांचे संगोपन करण्यात येत असल्याचे दाखवत दलालामार्फत त्यांची विक्री होत आहे. झटपट पैसे मिळवण्याचे माध्यम म्हणून युवावर्ग विशेषत १८ ते २५ वयोगटातील व्यक्ती याकडे आकर्षिली जात आहे.

केवळ भ्रामक बाजार

मांडूळ किंवा वन्य जीवांचा वापर करून अघोरी विद्या किंवा गुप्तधन मिळविता येते, या सर्व केवळ अंधश्रद्धा आहेत. वास्तविक मांडुळाची कातडी बाजारात शंभर रुपयालाही कोणी घेत नाही. पण अशा प्रकारांची प्रसिद्धी होत असल्याने युवावर्ग याकडे आकर्षिला जातो. हे प्रकरण कोणाच्या तरी जीवावर बेतू शकते, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.

– रवींद्र सोनार (वन्य परिमंडळ अधिकारी, नाशिक)

वन्य जीवांचे संरक्षण गरजेचे

मांडुळ हा दुर्मीळ होत चाललेला प्राणी आहे. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून कृत्रिमरित्या मांडुळाची निर्मिती करणे, त्याचे वजन वाढविण्या पर्यंत लोकांची मजल गेली आहे. गुप्त धनाचा शोध घेण्यासाठी मांडूळ, धनवृद्धीसाठी कासव उपयुक्त ठरते हा गैरसमज असल्याने कासव आणि मांडुळाला विशेष मागणी आहे. यासाठी परप्रांतीयांचा वापर होतो. अंनिसचा या सर्व प्रकारांना विरोध असून वन्य जीवांचे संरक्षण गरजेचे आहे.

– कृष्णा चांदगुडे (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)